तुमच्या बायोडेटावर एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज नावाचा एक कोपरा असतो. त्यात काय लिहिता तुम्ही? काय वाट्टेल ते ठोकता, कोरंच ठेवता? मग अवघड आहे, तुम्हाला जॉब मिळणं.
एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज किती महत्त्वाच्या असतात? पूर्वी आपला अभ्यास आणि आपण बरे असा एक समज होता, मुलगा इतर अँक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लागला की, पालकांना अभ्यासाची चिंता असायची. आणि आता मात्र एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम ठरेल अशी स्थिती आहे.
पुण्यातील बहुतांशी इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन कॉलेजमध्ये मी वेगवेगळ्या कारणांसाठी गेलेलो आहे. वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळा अनुभव आहे. चांगली कॉलेजेस चांगली का आहेत यामागचं एक कारण हेच की तिथे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळी स्किल्स कसे डेव्हलप होतील याकडे विशेष लक्ष दिलं जातं. परंतु बहुतांश कॉलेजं हे करत नाहीत. अर्थात, आपणही निव्वळ कॉलेजवर अवलंबून राहणं योग्य नाही. विद्यार्थीही स्वत:च पुढाकार घेत वेगवेगळ्या कार्यक्रमात-उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
हे सगळं मी का सांगतोय तर तुमच्या बायोडेटावर एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज नावाचं एक सेक्शन मुद्दाम असतं. तिथं काहीही ठोकून दिलं तर चालतं असा तुमचा समज असेल तर तो बदला. मुलाखत घेणारे अनेक जण हा मुद्दा आवर्जून पाहतात. कॉलेजमध्ये होणार्या किती इव्हेण्टमध्ये तुम्ही सहभागी होता? ते मॅनेज करता? काही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कमिटीज असतात. या कमिटीजवर काम केल्यामुळे वेगवेगळी सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करण्याची संधी मिळते. एखाद्या कार्यक्रमाचं संचालन, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन, तुम्हाला व्यवस्थापनाचे उत्तम धडे देत असतात. हेच अनुभव, पुढे उपयोगात येतात.
बरेचसे मुलाखतकर्ते अशा अँक्टिव्हिटीजबद्दल प्रश्न विचारत असतात. आता एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळण्याचा आणि या एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीजचा संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु अशा अँक्टिव्हिटींमधून तुमची व्यवस्थापन कौशल्य, टीम स्किल्स जोखली जातात. व्यावसायिक संस्थेमध्ये हीच स्किल्स आवश्यक असतात. कॉलेजातल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे तुमचं कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन आणि भाषाही सुधारू शकते.
वैयक्तिक पातळीवर, समविचारी मित्रांना एकत्र करून आपण बरंच काही करू शकतो. ट्रेकिंगला जाण्यापासून ते सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यापर्यंत, साहित्य-नाटक ते अगदी गणेशोत्सवाच्या आयोजनापर्यंत अनेक उपक्रम अवतीभोवती घडतच असतात.
तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या प्रगतीचं बीज अशाच अनेक उपक्रमांत सापडू शकेल. तेव्हा एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज असं बायोडाटात लिहायला तुमच्याकडे काय आहे, याचा विचार कराच.
(लोकमत, २८ फेब्रु २०१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा