स्वत:विषयी काय सांगाल? या प्रश्नाचं खरं खरं उत्तर ज्याला देता येतं, त्यालाच उत्तम करिअर संधी आहे, असं समजा!
स्वत:विषयी काय सांगाल, हे जर आपण एखाद्याला विचारलं तर त्या व्यक्तीला खूप विचार करावा लागतो. पण तेच दुसर्याबद्दलची मतं विचारा, भरपूर माहिती असते. भरपूर बोलता येतं.
नोकरी मिळण्याचा, जॉब इंटरव्ह्यूचा, स्वत:बद्दलच्या माहितीचा अथवा दुसर्याबद्दल असणार्या मतांचा काय संबंध, असा प्रश्न तुम्ही नक्की विचारू शकता, पण तो संबंध आहे. आणि खूप मोठा आहे. तुमच्या यशाचा पाया हा या स्वत:विषयी असणार्या माहितीवर अवलंबून असतो. यालाच इंग्रजीमध्ये आपण सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो.
आपण स्वत:ला खरंच ओळखतो हा प्रश्नच आहे. बरेचदा इंटरव्ह्युमध्ये विचारतात, स्वत:विषयी काही सांगा. अनेकांना, नावापलीकडे काहीच सांगता येत नाही. कारण साधं ईमेल लिहिण्यापासून तर बायोडेटामध्ये आपण स्वत:विषयी काय लिहितो इथपर्यंतची ओळख आपण बर्याचदा दुसर्याकडून उधार घेतलेली असते. त्यामुळे स्वत:विषयी काही सांगता येत नाही, इकडून तिकडून शब्द आणावे लागतात.
एका कॉलेजात कॅम्पसमध्ये सिलेक्शन करताना शंभर-दीडशे मुलांनी दिलेल्या बायोडेटांवर ‘ऑबजेक्टिव्ह’ म्हणून जे लिहिले होते ते जवळपास ९0 टक्के मुलांचे सारखेच होते. आता हे खरंच शक्य आहे का? आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आणि आपण जे शिकलो, त्याप्रमाणे जर आपलं करिअर आपण करत असू तर प्रत्येकाचे ऑबजेक्टिव्ह अर्थात करिअरचे ध्येय एकसारखेच कसे असू शकेल? पण ते होतं कारण सगळ्यांचं कॉपी/पेस्ट.
आपल्या बर्याचशा नोकरीच्या संधी या कॉपी/पेस्टमुळे आणि स्वत:विषयी काहीच न सांगता आल्यामुळे आपल्या हातातून निघून जातात.
पण हे मुलांच्या लक्षातच येत नाही. ते कसाबसा बायोडाटा लिहितात, तेच ते शब्द, ज्यातून त्या विद्यार्थ्याच्या क्षमतांविषयी, त्याच्या ध्येयाविषयी काहीच कळत नाही.
त्यात बर्याचदा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा शॉर्टटर्म असतो. जेव्हा कंपनी एखाद्या उमेदवाराला निवडते तेव्हा ती अर्जंट जॉब देत नसते, त्या उमेदवाराला एक करिअर म्हणून एक संधी-पर्याय देत असते. आणि विद्यार्थ्यांचा/उमेदवारांचा दृष्टिकोन फक्त जॉब . मिळवणं एवढाच असेल तर त्याच्याऐवजी लॉँग टर्म विचार करणार्या उमेदवाराला अर्थात करिअरचा विचार करणार्या उमेदवाराला कंपनी जास्त पसंती देते.
पण करिअर करायचं म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर प्रथम स्वत:ला समजून घेणं आवश्यक आहे.
मी एखाद्या तरुणाला मुलाखतीमध्ये त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत हे विचारतो तेव्हा तो काही तरी टिपीकल उत्तरं देतो. पण या गोष्टी तुझी स्ट्रेंथ आहे असं का वाटतं या प्रश्नावर त्यांना काहीच उत्तर देता येत नाही. कारण, स्वत:विषयी काही माहितीच नसते.
चांगलं कम्युनिकेशन स्किल ही माझी स्ट्रेंथ आहे, लीडरशिप ही माझी स्ट्रेंथ असं जेव्हा उमेदवार सांगतो तेव्हा ती स्ट्रेंथ त्याला जस्टीफाय करावी लागते. तेच अनेकांना जमत नाही.
अनेकांना हमखास विचारलं जातं, स्वत:त काय सुधारणा करायला आवडेल? बरेच जण तर गप्पच होतात, ट्रान्समध्ये जातात. कारण त्यांनी याचा कधी विचारच केलेला नसतो. मग मी इमोशनल आहे, मी मनाला फार लावून घेतो किंवा मी कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. (फिअर टू से नो) यासारखी छापील उत्तरं दिली जातात.
तसं पाहता जगातील शंभर टक्के लोक इमोशनलच असतात. हिटलरसुद्धा इमोशनलच होता. इमोशनल असणं हा काही वीकनेस असू शकत नाही. पण हे समजूनच न घेता काहीबाही सांगून टाकलं जातं.
म्हणून सर्वप्रथम एखाद्या जॉबसाठी अप्लाय करण्याच्या आधी स्वत:बद्दल विचार करणे, स्वत:ला समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
खुद के गिरेबान मे देखना भी सिखो दोस्तो!
(लोकमत, २१ जाने २०१४)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा