शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

तुम्ही स्वत:ला अपडेट कसं ठेवता?

तू काय वाचतोस ? हा प्रश्न विचारला की बर्‍याच जणांची दांडी उडते. पुस्तक सोडा, रोजचा पेपरही जो वाचत नाही, त्याला कोण नोकरी देईल ?


‘वाचाल तर वाचाल’ हे तसं ऐकून ऐकून आपल्याला सरावाचंच झालेलं असतं. वडीलधार्‍यांनी हे नेहमीच सांगितलेलं असतं; ते तेच वाटतं. पण खरंच सांगा, वाचन ही गोष्ट किती गांभीर्यानं घेतो ?

तू काय वाचतोस? हा प्रश्न मी हमखास विचारतो. बर्‍याचदा उमेदवार चाचपडतात. काही जण ठोकून देतात. कोणत्या तरी पुस्तकाचं नाव सांगतात. पण हे सर्व वरवरचं असतं हे कळतंच. एका विद्यार्थ्याला हाच प्रश्न मागील महिन्यात विचारला, त्यानं अब्दुल कलाम यांचं ‘ इग्नायटेड माईण्डस’ हे उत्तर दिलं. 

‘केव्हा वाचलं?’ ‘मी बारावीला असताना.’ विद्यार्थ्याचं उत्तर. 
म्हणजे गेल्या चार वर्षांत ग्रॅज्युएट होईपर्यंत या महाशयांनी एकही पुस्तक वाचलं नव्हतं.

‘वर्तमानपत्र वगैरे वाचतोस की नाही?’ दुसर्‍या उमेदवाराला मी प्रश्न विचारला. 

‘हो, वाचतो की,’ त्याचं उत्तर. ‘बरं सांग, आजची हेडलाईन काय होती?’ या प्रश्नावर त्याचं उत्तर ‘सर आज वेळच नाही मिळाला.’ नंतर लक्षात आलं की हे महाशयही चुकून कधीही वर्तमानपत्र वाचत नव्हते.
अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं, वर्तमानपत्र वाचणं म्हणजे वेळेचा अपव्यय. हा समज बर्‍याच विद्यार्थ्यांचा असतो.

वर्तमानपत्रं किंवा पुस्तकं का वाचावीत? त्यामुळे काही फायदा होतो का? कदाचित पुस्तकं वाचल्यामुळे काहीच फायदा होत नाही, असा गैरसमज या मुलांचा होत असावा. वाचन केल्यानं आपली विचारांची रुंदी वाढते. उंची वाढते. विचार प्रगल्भ व्हायला मदत मिळते. शब्दसंचय वाढतो. तुम्ही एकटे असाल, तर पुस्तकंच तुमचे खरे मित्र असतात. मोठय़ा लोकांची आत्मचरित्रं जगण्याचा नवा मार्ग दाखवतात. या जगात आपणच अयशस्वी नाही तर मोठमोठी माणसंही अयशस्वी होती. त्यांनी यश कसं मिळवलं हे आपल्याला कळतं. जॉब मिळाल्यावर तुम्हाला बर्‍याचदा वेगवेगळ्या विषयांवर (अर्थात व्यवसायासंबंधी) गोष्टीवर, प्रोजेक्टवर मतं द्यावी लागतात. प्रेझेण्टेशन्स घ्यावी लागतात. अवांतर वाचनाची त्यासाठीही मदत होते.

वर्तमानपत्रं तर वाचायलाच हवीत. ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा करंट अफेअरचा विषय मिळाला तर त्यावर काही बोलता येईल. अनेक जण काही वाचतच नाहीत मग त्यांना तोंडच उघडता येत नाही? 
‘हाऊ यू अपडेट युवर नॉलेज’?

तुझं ज्ञान तू कसं अद्ययावत ठेवतो हाही प्रश्न मुलाखतीत असतो. काही मुलं इंटरनेट वगैरे पाहतो, अशी उत्तरं देतात. पण फोकस विषयावर ठेवून नीट ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन हवंच.
आजकाल ऑनलाइन पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्रंही उपलब्ध आहेत. त्याचाही उपयोग आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी होऊ शकेल.

अनेक मुलं अभ्यासात बरी असून हमखास या टप्प्यात कमी पडतात. त्यांना जगाचं काही ज्ञान नसतं, ना भान असतं. आणि मग त्यांना कळत नाही की, आपल्याकडे सगळं असून आपलं सिलेक्शन का होत नाही.
उत्तर एकच, तुमचं वाचन नाही, तुम्ही अपडेट नाही.

(लोकमत १४ मार्च २०१४) 

(ह्याच विषयावर माझा इंग्रजी भाषेतील लेख येथे वाचा http://vinodtbidwaik.blogspot.in/2013/10/why-i-read.html)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: