सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

अरे, काही कॉमनसेन्स आहे की नाही?

 
 कॉमनसेन्स हा शब्द आपण रोजच्या जीवनात नेहमीच वापरतो. हा शब्द आपल्या एवढय़ा जवळचा आहे की एखादी घटना घडल्यावर चटकन आपल्या जिभेवर हा शब्द येतो. 

‘हा कॉमनसेन्सचा भाग आहे. एवढाही कॉमनसेन्स नाही?’ ‘अरे कुठे गेला तुझा कॉमनसेन्स?’ अशासारखी वाक्यं अगदी क्षणाक्षणाला वापरली जातात. दुसर्‍यांच्या कॉमनसेन्सबद्दल असे सर्रास प्रश्न निर्माण करताना, आपला कॉमनसेन्स मात्र आपण खूपदा वापरत नाही.
जे वैयक्तिक संदर्भात होतं तेच कामाच्या, नोकरीच्या जागी हमखास होतं.
कामाच्या जागी बर्‍याच गोष्टी कॉमनसेन्सवर साध्य होऊ शकतात. करता येऊ शकतात. बर्‍याच किचकट प्रश्नांची उत्तरं अगदी साधी असू शकतात. 
पण असतो काय हा कॉमनसेन्स?
एखाद्या गोष्टीचं, घटनेचं सारासार विवेकदृष्टीनं किमान (कमीत कमी) समज वापरून केलेलं विश्लेषण म्हणजे कॉमनसेन्स. 
अवघड प्रश्न हा आहे की, हा कॉमनसेन्स येतो कसा? 
तो येत नाही चटकन, कमवावा लागतो. रोजच्या अनुभवातून, निरीक्षण शक्तीतून आपण हा कॉमनसेन्स कमवत असतो. 

उदाहरणार्थ, आपण पेपरमध्ये फसवणुकीच्या, दुप्पट तिप्पट व्याज देण्याच्या लॉटरी लागण्याच्या, काहीही न करता अमुक लॉटरी लागल्याचे ईमेल्स येण्याच्या प्रकरणात फसलेल्यांच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. आणि अनेकदा शिकलीसवरलेली मंडळीही या सगळ्यात अडकल्याचं वाचतो. 
का होतं असं? असे फसवणुकीचे गुन्हे नेहमी घडत असताना, आपण वाचत असतानाही लोक का अडकतात या ट्रॅपमध्ये?  आपल्याला नेहमी वाटतं की, जातो कुठं यांचा कॉमनसेन्स? 
म्हणजेच काय कॉमनसेन्स कमवायला नेहमी स्वत:लाच आलेल्या अनुभवाची गरज असते, असं नाही. 
अनेकांचं ऐकून, वाचून, मिळालेली माहिती योग्यवेळी पूर्ण विचारांती वापरू शकतो. तोच हा कॉमनसेन्स.
काही घटना वारंवार घडत असल्या तर मागे आपण अशा परिस्थितीत कसे वागलो होतो हे आठवता येतं. त्यातून आपण स्वत:त सुधारणा करतो. करू शकतो. म्हणजे अर्थात सुधारणा करण्याची तयारी हवी.
रोजच्या आयुष्यात घडणार्‍या खूप घटना असतात. अगदी छोट्या छोट्या. ते छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला असा समजेवर आधारित कॉमनसेन्सच वापरावा लागतो.
‘एमबीए’च्या कोर्समध्ये हा कॉमनसेन्स मात्र शिकवला जात नाही.
तो आपल्यालाच कमवावा लागतो. पण अनेकांना वाटतं की, आपण एमबीए आहोत, आपल्याला काय असले प्रश्न विचारतात?
आता हेच पहा, तुम्ही मुलाखतीला गेलात, मुलाखत सुरू आहे, तुमचा मोबाइल बंद करायचा तुम्ही विसरलात आणि अचानक तुमच्या मोबाइलची रिंग वाजली तुम्ही काय कराल? 
- कधी कधी मुलाखतकर्ता तुमचा कॉमनसेन्स बघण्यासाठी एखादी अशीच परिस्थिती निर्माण करतो. आजकाल अनेक ऑफिसमध्ये ऑफिसबॉय वगैरे नसतात. त्यामुळे चहा, कॉफी स्वत:च घ्यावी लागते. अशा वेळेस एखादा मुलाखतकर्ता तुम्हाला कॉफी ऑफर करत असेल तर काय कराल?
जर तुम्ही खरंच मुलाखतीची नीट तयारी केलेली असेल, तर हे प्रकरण हॅन्डल करणं फारसं कठीण नाही. 
त्यासाठी काही गोष्टी तरी नक्की करता येतील.
तुम्ही मुलाखतीच्या अर्धा तास आधी तरी त्या ऑफिसमध्ये हजर रहायला हवं. तुमच्या निरीक्षणातून ऑफिसचं कल्चर, कामाची पद्धत, लोकांच्या वागण्यातून तुम्ही काही अंदाज लावू शकता.

जर ऑफिसमध्ये इनफॉर्मल कल्चर असेल, ऑफिसबॉईज नाहीत इथं कामाला असं लक्षात आलं तर तुम्ही कॉफी अगदी नम्रपणे नाकारू शकता. 
बर्‍याचदा कॉफी ऑफर करणं हा निव्वळ एक फॉरमॅलिटीचा भाग असू शकतो.
अशा वेळेस आपण कसं वागायचं हे आपला कॉमनसेन्सच आपल्याला सांगतो. तो सदासर्वकाळ एकसारखा नसतो आपण तो डेव्हलप करू शकतो. तो कसा करायचा?

तर त्यासाठी रोजच्या रोज अगदी झोपेतून उठल्यापासूनच्या घटनांचा अभ्यास करायला हवा, आपण कसे वागतो, कसे वागू शकलो असतो हे जरा नीट बारकाईनं पाहिलं तर जमू शकेल.

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

तुमचं पटतं का लोकांशी?

·   

जेव्हा
तुम्ही एखाद्या जागी काम करता, तेव्हा तुम्ही फक्त एकटेच नसता, तुमच्यासारखे बरेच जण  तिथं नोकर्‍या करतात. आपापल्या कामात मग्न असतात. या सर्व लोकांसोबत तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं. तुमचं काम तुमच्या सहकार्‍यांवरसुद्धा अवलंबून असू शकतं. त्यात कंपनीतलं वातावरण वेगळं असतं. स्पर्धा असते. प्रत्येकाला प्रगती करायची असते, पगार वाढवून घ्यायचा असतो, प्रमोशन हवं असतं. प्रत्येकाचं ध्येयच स्वत:ची प्रगती हेच असतं.  अशावेळेस काही कारणांमुळे बरीचशी मंडळी इतरांना सहकार्य करत नाहीत. काहींच्या मनात भीती असते, काही लोकांना स्वत:चं नॉलेज फक्त बॉससमोर दाखवायचं असतं.  आणि इथंच खरे प्रश्न निर्माण होतात.

 दक्षिण आफ्रिकेतल्या जंगलातल्या वाघ आणि हरणाच्या कथेसारखं असतं हे सारं. म्हणजे काय तर रोज भल्या पहाटे वाघ आणि हरीण उठत आणि पळायला लागत. पण दोघांची ध्येयं वेगवेगळी, पळत दोघंही, जिवाच्या आकांतानं पळत, पण ध्येय वेगळं. वाघाला आपल्या पोटासाठी हरणाची शिकार करायची म्हणून तर हरणाला आपला जीव वाचविण्यासाठी पळावं लागायचं.
नोकरदार माणसांचं आयुष्यही असंच  असतं. कोणीतरी वाघ असतो, कोणीतरी हरीण असतं. पळापळ मात्र अटळच. 
अशा वातावरणात तुम्ही हे सर्व कसं हँडल करता यावर तुमचं यश अवलंबून असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांसोबत काम करताना थोडं कठीण जाऊ शकतं. प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा वेगवेगळी असते. काही जण स्वत:चं स्वत:चं बघतात, काही जण सहकार्य करतात, काही जण सहकार्य करण्याचं नाटक करतात. काही जण तुम्हाला उभंही करत नाहीत. अशा एकंदरीत जंगलात तुम्ही तुमचं काम कसं करून घेता अथवा दुसर्‍याकडून कसं करून घेता हे महत्त्वाचं ठरतं. नव्या काळात तर हे सूत्र फारच महत्त्वाचं ठरत चाललं आहे.
मात्र हे लक्षात न घेता, बरेच विद्यार्थी, उमेदवार आपल्या बायोडाटावर बिनधास्त लिहितात.
Interpersonal Skills. त्याचा अर्थ त्यांना माहितीच नसतो. कुठून तरी कॉपी-पेस्ट करून बायोडाटात लिहून टाकतात. 
आणि प्रत्यक्ष प्रश्नात मात्र फसतात. 
‘वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या, वेगवेगळी ध्येयं असणार्‍या लोकांसोबत राहून, त्यांचा विश्‍वास संपादन करून, कधीतर त्यांना प्रभावित करून तुम्ही तुमचं काम करू शकता का?’ असा प्रश्न विचारला जातो तेव्हा मात्र उमेदवारांकडे त्यांचं उत्तर नसतं. कारण अनेकांनी या सार्‍याचा काही विचारच केलेला नसतो.
तो करायला हवा. पाण्यात पडल्यावर पोहायला येईल, असं म्हणून नाही चालणार, ते आधीपासूनच शिकायला हवं, तसा निदान विचार तरी करायला हवा.
ऑफिसातलं वातावरण म्हणजे तरी काय मानवी संबंधांचंच जाळं असतं. आयुष्यामध्ये मानवी संबंध कसे प्रस्थापित करता आणि जोपासता, हे खूप फायद्याचं ठरू शकतं. हे मानवी संबंध तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा सिद्ध करत असतात. 
तेव्हा लक्षात ठेवा, मुलाखतीच्या वेळेस कम्युनिकेशन स्किल यासंदर्भात काही प्रश्न विचारून मुलाखतकर्ता हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही माणसांशी नक्की कसं वागाल? 
तुम्ही जे उत्तर द्याल त्यातून त्याला कळायला हवं की, तुमचा मानवी स्वभावाचा अभ्यास कसा आहे? इतरांचा स्वभाव समजल्यावर तुम्ही कसे वागाल, तुमच्या वागण्यानं समोरच्याला कसं प्रभावित कराल? समोरच्या व्यक्तीच्या स्वभावानुसार तुमचं वर्तन तुम्ही कसं ट्यून कराल?
वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींसोबत आत्मविश्‍वासानं कसं वागता? स्वत:ची प्रतिमा कशी तयार/निर्माण कराल?
कशा पद्धतीनं आणि किती वेगानं मिक्स अप होऊ शकाल?
आणि मुख्य म्हणजे इतर व्यक्तींशी तुम्ही कसे संबंध जोपासाल?

अर्थात असं समजू नका की, सर्व मुलाखतकर्ता हे सर्व तुम्हाला असे डायरेक्ट प्रश्न विचारेल आणि मग तुम्ही उत्तर द्याल. तो प्रश्न भलताच विचारेल आणि तुमच्या उत्तरावरून तुमच्या या क्षमतेचा अंदाज बांधेल.  मुलाखतीत तुम्ही जी उत्तरं द्याल त्यावरून तुमच्या कम्युनिकेशन स्किलचाच नाही तर माणसं जोडण्याच्या कलेचाही अंदाज येईल, नुस्तं बायोडाटात गुड इण्टरपर्सनल स्किल्स असं लिहिलं की काम भागत नसतंच.