शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४

तुम्ही स्वत:ला अपडेट कसं ठेवता?

तू काय वाचतोस ? हा प्रश्न विचारला की बर्‍याच जणांची दांडी उडते. पुस्तक सोडा, रोजचा पेपरही जो वाचत नाही, त्याला कोण नोकरी देईल ?


‘वाचाल तर वाचाल’ हे तसं ऐकून ऐकून आपल्याला सरावाचंच झालेलं असतं. वडीलधार्‍यांनी हे नेहमीच सांगितलेलं असतं; ते तेच वाटतं. पण खरंच सांगा, वाचन ही गोष्ट किती गांभीर्यानं घेतो ?

तू काय वाचतोस? हा प्रश्न मी हमखास विचारतो. बर्‍याचदा उमेदवार चाचपडतात. काही जण ठोकून देतात. कोणत्या तरी पुस्तकाचं नाव सांगतात. पण हे सर्व वरवरचं असतं हे कळतंच. एका विद्यार्थ्याला हाच प्रश्न मागील महिन्यात विचारला, त्यानं अब्दुल कलाम यांचं ‘ इग्नायटेड माईण्डस’ हे उत्तर दिलं. 

‘केव्हा वाचलं?’ ‘मी बारावीला असताना.’ विद्यार्थ्याचं उत्तर. 
म्हणजे गेल्या चार वर्षांत ग्रॅज्युएट होईपर्यंत या महाशयांनी एकही पुस्तक वाचलं नव्हतं.

‘वर्तमानपत्र वगैरे वाचतोस की नाही?’ दुसर्‍या उमेदवाराला मी प्रश्न विचारला. 

‘हो, वाचतो की,’ त्याचं उत्तर. ‘बरं सांग, आजची हेडलाईन काय होती?’ या प्रश्नावर त्याचं उत्तर ‘सर आज वेळच नाही मिळाला.’ नंतर लक्षात आलं की हे महाशयही चुकून कधीही वर्तमानपत्र वाचत नव्हते.
अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं, वर्तमानपत्र वाचणं म्हणजे वेळेचा अपव्यय. हा समज बर्‍याच विद्यार्थ्यांचा असतो.

वर्तमानपत्रं किंवा पुस्तकं का वाचावीत? त्यामुळे काही फायदा होतो का? कदाचित पुस्तकं वाचल्यामुळे काहीच फायदा होत नाही, असा गैरसमज या मुलांचा होत असावा. वाचन केल्यानं आपली विचारांची रुंदी वाढते. उंची वाढते. विचार प्रगल्भ व्हायला मदत मिळते. शब्दसंचय वाढतो. तुम्ही एकटे असाल, तर पुस्तकंच तुमचे खरे मित्र असतात. मोठय़ा लोकांची आत्मचरित्रं जगण्याचा नवा मार्ग दाखवतात. या जगात आपणच अयशस्वी नाही तर मोठमोठी माणसंही अयशस्वी होती. त्यांनी यश कसं मिळवलं हे आपल्याला कळतं. जॉब मिळाल्यावर तुम्हाला बर्‍याचदा वेगवेगळ्या विषयांवर (अर्थात व्यवसायासंबंधी) गोष्टीवर, प्रोजेक्टवर मतं द्यावी लागतात. प्रेझेण्टेशन्स घ्यावी लागतात. अवांतर वाचनाची त्यासाठीही मदत होते.

वर्तमानपत्रं तर वाचायलाच हवीत. ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा करंट अफेअरचा विषय मिळाला तर त्यावर काही बोलता येईल. अनेक जण काही वाचतच नाहीत मग त्यांना तोंडच उघडता येत नाही? 
‘हाऊ यू अपडेट युवर नॉलेज’?

तुझं ज्ञान तू कसं अद्ययावत ठेवतो हाही प्रश्न मुलाखतीत असतो. काही मुलं इंटरनेट वगैरे पाहतो, अशी उत्तरं देतात. पण फोकस विषयावर ठेवून नीट ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन हवंच.
आजकाल ऑनलाइन पुस्तकं, मासिकं आणि वर्तमानपत्रंही उपलब्ध आहेत. त्याचाही उपयोग आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी होऊ शकेल.

अनेक मुलं अभ्यासात बरी असून हमखास या टप्प्यात कमी पडतात. त्यांना जगाचं काही ज्ञान नसतं, ना भान असतं. आणि मग त्यांना कळत नाही की, आपल्याकडे सगळं असून आपलं सिलेक्शन का होत नाही.
उत्तर एकच, तुमचं वाचन नाही, तुम्ही अपडेट नाही.

(लोकमत १४ मार्च २०१४) 

(ह्याच विषयावर माझा इंग्रजी भाषेतील लेख येथे वाचा http://vinodtbidwaik.blogspot.in/2013/10/why-i-read.html)

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०१४

ग्रुप डिस्कशन...

ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही गप्पच बसता? किंवा उठून दिसायचं म्हणून खूप बोलता, दुसर्‍यांना संधी न देता आपलेच विचार रेटायला लागता?
मग अवघड आहे, तुमचं सिलेक्शन होणं.


‘‘नोकरीच्या निवड प्रक्रियेमध्ये गटचर्चा एवढी महत्त्वाची का मानली जाते? विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात. गटचर्चेमध्ये एखादा मुलगा नाही चांगला बोलला तर काय फरक पडतो? कसं बोलायचं हे त्याला नंतरही शिकवता येईल?’’ -एका कॉलेजमधील प्राध्यापक मला विचारत होते.
‘‘कसं बोलायचं, हे नक्कीच शिकवता येईल, पण काय बोलायचं, केव्हा बोलायचं, हे नाही शिकवता येणार.’’- मी त्यांना उत्तर दिलं.
ग्रुप डिस्कशन अथवा गटचर्चा ही नोकरीसाठीच्या निवडप्रक्रियेमधील एक महत्त्वाची पायरी असते. 

या गटचर्चेमध्ये काय बघितलं जातं? पंधरा-वीस मिनिटांच्या समूहचर्चेत असं काय असतं की, ज्या आधारावर विद्यार्थ्यांचं करिअर अवलंबून असतं. बर्‍याचदा चांगली महाविद्यालयं विद्यार्थ्यांकडून ग्रुप डिस्कशनची तयारी करून घेतात. अर्थात, ही तयारी एवढी जास्त असते की हे विद्यार्थी तयारी करून आले आहेत हेही जाणवते आणि तयारी करून आल्यासारखी चर्चा झाली की समजायचे, काहीतरी घोटाळा नक्कीच होणार आहे. गटचर्चेआधी एखादा विषय दिलेला असतो. हा विषय कोणताही असू शकतो. एखाद्या विषयात विद्यार्थ्यांच्या नॉलेजचा आणि वाचनाचा कस लागतो. उदा. ‘भारतीय अर्थव्यवस्थेची पुढील पाच वर्षे कशी असतील?’ या विषयावर बोलताना तुम्हाला मुळातच भारतीय अर्थव्यवस्थेची माहिती असायला हवी, त्यासाठी तुमचं वाचन, अर्थव्यवस्थेबद्दल तुमची मतं आणि भविष्याबद्दलची मतं तर्कसंगत मांडता यायला हवी, ते तुम्ही कसं मांडता हे महत्त्वाचं ठरतं. दुसर्‍या प्रकारात, तुम्हाला विषयाची जाण नसली, माहिती नसली तरी, तुमच्या मतावर तुम्ही गटचर्चेमध्ये बोलू शकतात. तुमची विचार करण्याची क्षमता, थॉट प्रोसेस, विचारांची खोली आणि तुम्ही तुमची मतं कशी मांडता, लॉजिक, योग्य शब्दांचा प्रयोग, विषयातील खोली, दुसर्‍यांच्या मतांचा आदर हे सारं बारकाईनं बघितलं जातं. तुम्ही निव्वळ बोलायला लागला आणि दुसर्‍यांना संधी न देता आपलेच विचार रेटायला लागलात की समजा, तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. अर्थात, तुमचे इतरही गुणधर्म येथे बघितले जातात. पण महत्त्वाचं म्हणजे टीममध्ये तुम्ही सर्वांना कसे सामावून घेता, टीममध्ये तुम्ही योग्यप्रकारे कसा भाग घेता, इतरांशी जुळवून घेण्याची तुमची तयारी आहे की नाही हेही बघितले जातं.

समूहचर्चा करणं आणि त्याची तयारी करणं ही काही फारशी कठीण गोष्ट नाही. तुम्ही एरवी तुमच्या मित्रांसोबत चर्चा करताच ना? हीच चर्चा थोडी वेगळ्या लेव्हलवर करा. एखाद्या विषयावर टिप्पणी करण्याची आपली सवय असतेच. ती व्यवस्थित मुद्देसूद, लॉजिकल करण्याची सवय लावा. बोलत राहा, घाबरू नका आत्मविश्‍वासानं आपली मतं मांडा, थोडं वाचन करा, टीव्ही बघा, इतरांची मतं विचारा. एकमेकांना बोलतं करा. इतरांची मतं पटली नाहीत तरी ऐकून घ्यायची तयारी ठेवा. शेवटी जॉबमध्येही हेच करायचं असतं.

(लोकमत ७ मार्च २०१४) 

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

Value addition : EXTRA असं काही आहे

तुमच्या बायोडेटावर एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज नावाचा एक कोपरा असतो. त्यात काय लिहिता तुम्ही? काय वाट्टेल ते ठोकता, कोरंच ठेवता? मग अवघड आहे, तुम्हाला जॉब मिळणं.


एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज किती महत्त्वाच्या असतात? पूर्वी आपला अभ्यास आणि आपण बरे असा एक समज होता, मुलगा इतर अँक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लागला की, पालकांना अभ्यासाची चिंता असायची. आणि आता मात्र एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम ठरेल अशी स्थिती आहे.

पुण्यातील बहुतांशी इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन कॉलेजमध्ये मी वेगवेगळ्या कारणांसाठी गेलेलो आहे. वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळा अनुभव आहे. चांगली कॉलेजेस चांगली का आहेत यामागचं एक कारण हेच की तिथे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळी स्किल्स कसे डेव्हलप होतील याकडे विशेष लक्ष दिलं जातं. परंतु बहुतांश कॉलेजं हे करत नाहीत. अर्थात, आपणही निव्वळ कॉलेजवर अवलंबून राहणं योग्य नाही. विद्यार्थीही स्वत:च पुढाकार घेत वेगवेगळ्या कार्यक्रमात-उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

हे सगळं मी का सांगतोय तर तुमच्या बायोडेटावर एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज नावाचं एक सेक्शन मुद्दाम असतं. तिथं काहीही ठोकून दिलं तर चालतं असा तुमचा समज असेल तर तो बदला. मुलाखत घेणारे अनेक जण हा मुद्दा आवर्जून पाहतात. कॉलेजमध्ये होणार्‍या किती इव्हेण्टमध्ये तुम्ही सहभागी होता? ते मॅनेज करता? काही कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कमिटीज असतात. या कमिटीजवर काम केल्यामुळे वेगवेगळी सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करण्याची संधी मिळते. एखाद्या कार्यक्रमाचं संचालन, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन, तुम्हाला व्यवस्थापनाचे उत्तम धडे देत असतात. हेच अनुभव, पुढे उपयोगात येतात.

बरेचसे मुलाखतकर्ते अशा अँक्टिव्हिटीजबद्दल प्रश्न विचारत असतात. आता एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळण्याचा आणि या एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीजचा संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. परंतु अशा अँक्टिव्हिटींमधून तुमची व्यवस्थापन कौशल्य, टीम स्किल्स जोखली जातात. व्यावसायिक संस्थेमध्ये हीच स्किल्स आवश्यक असतात. कॉलेजातल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे तुमचं कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन आणि भाषाही सुधारू शकते.

वैयक्तिक पातळीवर, समविचारी मित्रांना एकत्र करून आपण बरंच काही करू शकतो. ट्रेकिंगला जाण्यापासून ते सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यापर्यंत, साहित्य-नाटक ते अगदी गणेशोत्सवाच्या आयोजनापर्यंत अनेक उपक्रम अवतीभोवती घडतच असतात. 

तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या प्रगतीचं बीज अशाच अनेक उपक्रमांत सापडू शकेल. तेव्हा एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीज असं बायोडाटात लिहायला तुमच्याकडे काय आहे, याचा विचार कराच.

(लोकमत, २८ फेब्रु २०१४) 

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

नेटवर्किंग- तुमचे मित्र कुठे जॉब करतात?

नेटवर्किंग पाहिजे यार असं म्हणता तुम्ही, पण आहे तुमचा कॉलेजातल्या सिनिअर्सशी संपर्क? ते देतील कुणाला तुमचा रेफरन्स?

ओळखीशिवाय काम होत नाही. आमच्या ओळखी नाहीत म्हणून आम्हाला जॉब मिळत नाहीत, अशासारखी कारणं बर्‍याचदा दिली जातात.

खासगी क्षेत्रात हे खरं आहे का? ओळख म्हणजेच वशिला असं सांगण्याचा हा प्रयत्न असतो. परंतु निव्वळ ओळखीमुळे प्रोफेशनल कंपनीमध्ये जॉब मिळत नाही. तुमची ओळख आहे. परंतु आवश्यक स्कीलसेट नसेल, तर तुमची नियुक्ती होईल याची काहीच गॅरंटी नाही.

कंपन्या एखाद्या पोझिशनसाठी जेव्हा निवड प्रक्रिया राबवतात, त्यामागे एक लॉजिकल प्रोसेस असते. रेझ्युमे मागवताना, शोधताना वेगवेगळी माध्यमं वापरली जातात. रेफरन्स अथवा ओळख हा त्यापैकी एक सोर्स असतो. तुमचा सीव्ही/रिझ्यूम निवड प्रक्रियेत सामावला जाऊन तुम्हाला मुलाखतीचा कॉल येण्याची संधी मात्र ओळखीतून मिळू शकते. मुळात आपल्याला कर्मचार्‍याच्या माहितीतला, संपर्कातला गुणी माणूस कंपनीत रेफर करणं यात काही वावगं नाही, किंवा तसं केलंही जातं. ओळख फक्त मुलाखतीचं आमंत्रण देण्यापुरती, योग्य माणूस शोधण्यापुरती ही एक खिडकी असते. सांगायचा मुद्दा एवढाच की, कॉलेजमध्ये असताना आपण आपल्या किती सिनिअर्सच्या संपर्कात असतो, तुमचे सिनिअर्स कोठेतरी नोकरी करत असतील तर ते तुमचा रेफरन्स ‘रेफरल प्रोग्रॅम’मध्ये देऊ शकतील. यालाच आजच्या आधुनिक जॉब मार्केटमध्ये नेटवर्किंग म्हणतात. हे नेटवर्किंग फक्त नोकरीच नव्हे तर जॉब मिळाल्यावर प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं.

एखादं काम करताना खूप लोकांची मदत आपल्याला घ्यावी लागते. आधुनिक कार्यसंस्कृतीमध्ये तुमच्या पॉवरपेक्षा (पदाने आलेली) तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत किती वेगाने ओळखी करता आणि त्या ओळखीचे एखाद्या संकल्पनेत, व्यवसायात अथवा कंपनीसाठी नव्या संधीमध्ये किती रूपांतर करू शकता, हे महत्त्वाचं ठरतं.

‘तुझे मित्र किती आहेत? तू तुझा वेळ मित्रांसोबत कसा घालवतो? अनोळखी व्यक्तिसोबत ओळख करून घ्यायला तुला आवडते का?’ यासारखे प्रश्न मुलाखतीच्या वेळेस विचारण्यामागे हेच कारण असतं. बर्‍याच मानसशास्त्रीय टेस्ट घेण्याचं कारणही हेच असतं.

त्यामुळे आजच्या जगात एकटं राहून चालणार नाही, स्वत:च्या कोशात जगून जॉब मिळणार नाही. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तीसोबत नेटवर्किंग करता तेव्हा तुम्ही एक संधी तयार करत असता. तुमचे प्रोफेसर, सिनिअर्स प्रोजेक्टच्या वेळी संपर्कात आलेले वेगवेगळ्या कंपन्यातले, संस्थातले ऑफिसर्स, एखाद्या कार्यक्रमात भेटलेल्या व्यक्ती तुम्हाला मदत करू शकतील. तुमचं नाव एखाद्या चांगल्या जॉबसाठी सजेस्ट करू शकतील. त्यामुळे ओळखी वाढवा, त्या जपा.

एक मात्र लक्षात ठेवा नेटवर्किंग एका बाजूने होत नाही. तुम्हाला शक्य असेल, तेव्हा तुम्हीही तुमच्या मित्रांना, ज्युनिअर्सना मदत करायला विसरू नका.

नेटवर्क जितकं मोठं, संधी तितक्या जास्त, हे लक्षात ठेवा.

(लोकमत, २१ फेब्रु २०१४)

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

कॉलेज प्रोजेक्ट-कॉपी/पेस्टला डच्चू

प्रोजेक्ट करायचा, कॉपी /पेस्ट. ना विषयाच्या खोलात जायचं, ना अभ्यास करायचा. ज्या कंपनीत प्रोजेक्ट करायचा तिची वेबसाइटही पहायची नाही. असं काम कराल तर कोण देईल नोकरी?

पुण्यातील व्यवस्थापन आणि इंजिनिअरिंग कॉलेजमधील अनेक मुलं समर प्रोजेक्टसाठी माझ्याकडे येत असतात. टर्ममध्ये मार्क्‍स मिळवण्यापुरती एक अँक्टिव्हिटी म्हणून या सर्व प्रोजेक्टकडे बघितलं जातं. या सार्‍याचा दोष मी फक्त या मुलांना देणार नाही, पण तरीही काहीतरी चुकतंच.

तेजल आणि सुहास. अशीच एक रिक्वेस्ट घेऊन माझ्याकडे आले. एखादा विषय घेऊन प्रोजेक्ट करायचा, एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. पंधरा एक दिवस कसंबसं यायचं, सर्टिफिकेट घ्यायचं आणि कुठून तरी कॉपी-पेस्ट करून प्रोजेक्ट तयारा करायचा हे एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांना त्यांचा प्रोजेक्ट स्कोप विचारला. तेव्हा ती दोन्ही मुलं गोंधळली. म्हणाली, ‘सर मार्केट सेगमेंटेशन’वर करायचाय’ ‘अरे हो, पण तुम्ही माझ्या कंपनीचा, आमच्या प्रॉडक्ट्सचा आणि आमच्या कॉम्पिटिटरबद्दलचा काही स्टडी केला का? किंवा आमची इंटरनेट साइट तरी बघितली का? मी विचारलं.
‘नाही सर वेळच मिळाला नाही.’- ते म्हणाले.

शेवटी जेव्हा मी त्यांना माझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे सांगितलं तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. 

‘बापरे, एवढं सर्व करायचं?’ ही त्यांची प्रतिक्रिया होती. चुकतं ते इथंच. तेवढय़ापुरतं काहीतरी करत अनेक जण धकवून नेतात. पण कॉलेजच्या प्रोजेक्ट -असाईनमेण्टला तुम्ही जेवढं महत्त्व द्याल तेवढं ते तुमच्या करिअरच्या दृष्टीने उपयोगाचे होईल. पण तसं होत नाही. कारण प्रोजेक्ट करण्याचं महत्त्व आणि गांभीर्यच तुम्हाला कळत नाही. 

प्रोजेक्ट करताना काय होतं? तुम्ही दोन-तीन मित्र एकत्र येतात. निव्वळ मित्र म्हणून नव्हे तर प्रोफेशनल म्हणून असाईनमेण्टवर काम करता. इंडस्ट्रीमध्ये जाता तेथे वेगवेगळ्या कर्मचार्‍यांसोबत, ऑफिसर्ससोबत चर्चा करता. किंबहुना तुमच्या शैक्षणिक उद्देशासोबत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू तुम्ही तिथे तपासत असता. प्रोजेक्ट तयार करताना, त्याच्यावर काम करताना, तुमची थॉट प्रोसेस, तुमचे टीम स्किल्स आणि इतरांशी डिल करताना तुमचं कम्युनिकेशन आणि इतरांवर प्रभाव पाडण्याचे कौशल्य हे सारं उपयोगात येत असतं. यासोबतच वेगवेगळ्या अधिकार्‍यांसोबत, कर्मचार्‍यांसोबत तुमच्या ओळखी होतात. या ओळखी भविष्यात तुमच्या उपयोगात येऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीच्या वेळेस तुम्ही तुमच्या प्रोजेक्टबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतात.

तुमचा अनुभव, तुमचं स्किल या प्रोजेक्टवरून मुलाखत घेणारा जोखत असतो. मुलाखत घेताना फ्रेशरला समजून घेण्याचा प्रोजेक्ट हे एक उत्तम माध्यम असतं. 
किंबहुना तुम्ही उत्तम प्रोजेक्ट केला तर जिथे तो प्रोजेक्ट केला ती कंपनीच तुम्हाला पुढील ऑफर देऊ शकते. 

म्हणून एकदा प्रोजेक्ट केल्यावर, तो कसा केला यावर एक छानसं प्रेझेंटेशन तयार करा, ते कंपनीतील अधिकार्‍यांना पाठवा. तुमच्या कॉलेजमध्ये शेअर करा.
हे सारं मी तेजल आणि सुहासला समजावलं. मग ते दोघे पुण्यातील पंधरा कंपन्यांच्या अधिकार्‍यांना भेटले, त्यांच्यांकडून माहिती मिळवली. माहितीचं विश्लेषण केलं, आणि कॉन्फिडेन्शियल माहिती सोडून सर्वांना एक छानसं प्रेझेंटेशन पाठवलं. दोघांनाही एका फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडस् कंपनीने सेल्स ट्रेनी म्हणून ऑफर दिली. 

नॉर्मल काम सर्वच जण करतात, गरज आहे थोडं एक्स्ट्रा माईल जाण्याची.!

(लोकमत १४ फेब्रु २०१४ )

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

कच्च्या इंग्रजीचा पचका


नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान किती आवश्यक आहे? 

एखाद्या ऑफिसमध्ये सर्व जण स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषा बोलत असतील तर दररोजचे असे किती संभाषण इंग्रजीत होते? 

खरेच इंग्रजी बोलणे आणि तेही फाडफाड बोलता येणे खरेच गरजेचे आहे का? नोकरी देणारे लोक या परदेशी भाषेवर एवढे प्रेम का करता? असे अनेक प्रश्न मला विचारले जातात.ज्या मुलांना इंग्रजी चांगले बोलता येत नाही त्यांना तर ही भाषा आपल्या प्रगतीतला अडसरच वाटते. 

माझ्या मते, तुम्ही कोणत्या क्षेत्रात तुमचे करिअर करू इच्छिता, आयुष्यात कोणत्या स्तरात पोहोचण्याची तुमच्या इच्छा आहे या गोष्टीवर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. ऑफिस मधील पत्र व्यवहार, संवाद, कामाचं स्वरूप इंग्रजीत आवश्यक असेल तर आपल्याला इंग्रजी व्यवस्थित लिहिता यायला हवी. आपले विचार इंग्रजीत मांडता यायला हवेत. आयटी, बीपीओ, केपीओ आणि तत्सम सेक्टरमध्ये तर इंग्रजी आवश्यक ठरते. पण कदाचित मॅन्युफॅक्चरिंगमध्ये शॉप फ्लोअरवर कामगारांना सांभाळणार्या शिफ्ट सुपरवायझरला इंग्रजीचे अद्ययावत ज्ञान असण्याची काही आवश्यकता नसते.

एकदा एका ऑटो कॉम्पोनंट बनवणार्या मोठय़ा कंपनीच्या प्लाण्ट मॅनेजर ने मला सांगितले होते, ‘इंटरव्ह्यूच्या वेळी एखादा फाडफाड इंग्रजी बोलणारा इंजिनिअर मी सहसा निवडत नाही, मला माहीत आहे, तो माझ्याकडे काही टिकणार नाही.’ त्याचे हे मत ऐकून मला हसावे की रडावे हे कळले नाही. पण उमेदवार निवडताना अशा गोष्टीही विचारात घेतल्या जातात, हे आपण लक्षात ठेवायला हवे.

सध्याच्या काळात इंग्रजी भाषा बोलता येणे अतिशय महत्त्वाचे आहे, इंग्रजी बोलणार्या उमेदवाराला निवडीत प्रेफरन्स मिळतो. पण नेहमी इंग्रजी येते म्हणून निवड होते असेही नाही. भाषेपेक्षा महत्वाचे असते ते कम्युनिकेशन. संवाद. भाषा कोणतीही असो, तुम्ही तुमचे कम्युनिकेशन कसे करता हे महत्त्वाचे असते. 

मॅनेजरपदासाठी आपण मुलाखत देत असाल तर इंग्रजी गरजेचे ठरते. तुम्ही मल्टिनॅशनलमध्ये काम करत असाल तर तुमचे इंग्रजी कसे आहे हेही बघितलं जाते. पण मुलाखतकर्ता फक्त आपलं भाषाज्ञान बघत नाही हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही तुमची मते कशी मांडता, समोरच्या व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीने प्रभावित करता हे महत्त्वाचे ठरते.

मुलाखतीच्या वेळेस जर इंग्रजीत संभाषण करताना अडचणी येत असतील, तर (आणि तुम्ही एण्ट्री लेव्हलला असाल) मुलाखत घेणार्याला तुम्ही तुम्हाला येत असलेल्या (आणि त्याला समजणार्या) भाषेत मुलाखत देण्याची विनंती करू शकता. मी स्वत: खूप उमेदवारांना ही संधी दिलेली आहे आणि त्यापैकी बरेचसे उमेदवार सिलेक्टही झालेले आहे. 

मात्र तुम्ही विनंती कशी करता, तुमचे तुमच्या विषयाचे ज्ञान, आत्मविश्वास कसा आहे हे ही महत्वाचे. केवळ इंग्रजीत बोलायचे म्हणून हातपाय गाळून, त-त करत बोलण्यात काही हाशील नाही. इंग्रजीची काळजी करू नका, शिकायला आणि नंतर बोलायला इंग्रजी अतिशय सोपी आहे, हे मी अनुभवानं सांगू शकतो.

हिंमत ठेवा.

(लोकमत, ७ फेब्रु २०१४)

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

कॉन्फिडन्स तो का नसतो? कुठून येतो?

श्रीरंग पडबिद्रीकर नावाचा उमेदवार माझ्यासमोर गोंधळून बसला आहे. बिचारा किंचित घाबरलेला, उगाचच. हाताची चाळवाचाळव आणि माझ्या केबिनमध्ये उगाचच चौफेर नजर फिरवतोय. त्याच्या डोक्यावरचं टेन्शन कमी करावं. या उद्देशानं मी श्रीरंगाला विचारलं, ‘काय श्रीरंग कसा आहेस?’ 

‘ठीक आहे सर’ तो. त्याला अजून कम्फर्टेबल बनवावं या उद्देशानं मी परत प्रश्न केला ‘का रे ठीक? चांगला नाहीस?’ तो कसानुसा हसला. म्हणाला, ‘बरा’.
मी हसलो. तोही हसला. 

‘तुझ्या या बायोडेटावर तुझी संपूर्ण माहिती आहे. चांगली आहे, पण तू जर तुझ्याबद्दल थोडी माहिती सांगितलीस तर बरं होईल.’ मी त्याला अजून कम्फर्टेबल करण्याच्या उद्देशानं विचारलं.

मुलाखत घेणारी व्यक्ती ही कोणत्या तरी परग्रहावरून आलेली असते आणि ती खूप दृष्ट असते, असा एक समज उमेदवारांमध्ये असतो. याच समजातून बिचारे मुलाखतीच्या आधीच स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. अर्थात, उमेदवाराला छळणारी मंडळीही असतात. पण आता तर अशा मुलाखतकर्त्याला ‘मुलाखती कशा घ्याव्यात’ याचं प्रशिक्षणही अनेक संस्था देत असतात.

माझा आजवरचा मुलाखती घेतानाचा अनुभव मात्र एकच सांगतो, जवळपास ६0-७0 टक्के मराठी मुलं ही मुलाखत देताना आत्मविश्वासाअभावी मागे पडतात. मुलाखत देताना जो आत्मविश्वास उमेदवारांमध्ये अपेक्षित असतो, तो न दाखवल्यामुळे पहिल्या काही सेकंदामध्ये स्वत:बद्दलचं निगेटिव्ह मत तयार करून बसतात.

मागच्या लेखात आपण ‘स्वत:बद्दल’च्या माहितीबद्दल वाचले असेलच. स्वत:विषयी काहीही सांगताना तुम्हाला विचार करावा लागतो. तो विचार झाला की जे आहे ते आत्मविश्वासानं सांगता यायला हवं. शहरातील मुलं, वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या हिंदी भाषिक मुलांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आलेला असतो. हाच आत्मविश्वास मराठी मुलं, स्पेशली ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये कमी पडतो. माझंच उदाहरण सांगतो, मी पहिल्यांदा विदर्भातील एक छोट्या खेड्यातून नाशिकसारख्या शहरात अकरावीला प्रवेश घेतला. तेव्हा माझा आत्मविश्वास कधी कधी मला दगा देत असे. इंग्रजी माध्यमात शिकलेले, फाडफाड इंग्रजी बोलणारे विद्यार्थी बघितले की, मी कोशात जायचो; पण जेव्हा माझ्यापेक्षा मठ्ठ मुलं पुढं जायला लागली, तेव्हा लक्षात आलं, काहीतरी गडबड आहे. मी कॉलेजमधील वेगवेगळे फोरम्स जॉईन केले. व्यक्तिमत्त्व विकासावर काम करणार्या एका जागतिक संघटनेत कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढू लागला.

आत्मविश्वास ही एका दिवसात वाढणारी गोष्ट नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असावा लागतो. आणि हा आत्मविश्वास जेव्हा तुम्ही स्वत:ला जगासमोर, समाजासमोर मुलाखतीमध्ये जेवढय़ा आत्मविश्वासाने तुम्ही सामोरे जाता, तेवढय़ा टक्क्याने तुमची सिलेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. मला खूपदा प्रश्न पडतो की, आपल्याकडे ज्या काही गुण/गोष्टी असतात त्याचा उपयोग आपल्याला करता यायला हवा, तो आपण का करत नाही? घाबरत, चाचपडत वागून तुम्ही पुढे येणार नाही.

श्रीरंग पडबिद्रीकरनं याचं आत्मविश्वासावर काम केलं. तो कमावला. पहिली मुलाखत त्याची फेल गेली, पण आता तो एका मल्टिनॅशनलमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून काम करतोय. तुमची संधीही तुम्हाला अशीच गवसू शकेल. 

(लोकमत, ३१ जाने २०१४ )

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

स्वत:विषयी काय सांगाल?

स्वत:विषयी काय सांगाल? या प्रश्नाचं खरं खरं उत्तर ज्याला देता येतं, त्यालाच उत्तम करिअर संधी आहे, असं समजा!

स्वत:विषयी काय सांगाल, हे जर आपण एखाद्याला विचारलं तर त्या व्यक्तीला खूप विचार करावा लागतो. पण तेच दुसर्‍याबद्दलची मतं विचारा, भरपूर माहिती असते. भरपूर बोलता येतं.
नोकरी मिळण्याचा, जॉब इंटरव्ह्यूचा, स्वत:बद्दलच्या माहितीचा अथवा दुसर्‍याबद्दल असणार्‍या मतांचा काय संबंध, असा प्रश्न तुम्ही नक्की विचारू शकता, पण तो संबंध आहे. आणि खूप मोठा आहे. तुमच्या यशाचा पाया हा या स्वत:विषयी असणार्‍या माहितीवर अवलंबून असतो. यालाच इंग्रजीमध्ये आपण सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो.

आपण स्वत:ला खरंच ओळखतो हा प्रश्नच आहे. बरेचदा इंटरव्ह्युमध्ये विचारतात, स्वत:विषयी काही सांगा. अनेकांना, नावापलीकडे काहीच सांगता येत नाही. कारण साधं ईमेल लिहिण्यापासून तर बायोडेटामध्ये आपण स्वत:विषयी काय लिहितो इथपर्यंतची ओळख आपण बर्‍याचदा दुसर्‍याकडून उधार घेतलेली असते. त्यामुळे स्वत:विषयी काही सांगता येत नाही, इकडून तिकडून शब्द आणावे लागतात.

एका कॉलेजात कॅम्पसमध्ये सिलेक्शन करताना शंभर-दीडशे मुलांनी दिलेल्या बायोडेटांवर ‘ऑबजेक्टिव्ह’ म्हणून जे लिहिले होते ते जवळपास ९0 टक्के मुलांचे सारखेच होते. आता हे खरंच शक्य आहे का? आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे आणि आपण जे शिकलो, त्याप्रमाणे जर आपलं करिअर आपण करत असू तर प्रत्येकाचे ऑबजेक्टिव्ह अर्थात करिअरचे ध्येय एकसारखेच कसे असू शकेल? पण ते होतं कारण सगळ्यांचं कॉपी/पेस्ट. 

आपल्या बर्‍याचशा नोकरीच्या संधी या कॉपी/पेस्टमुळे आणि स्वत:विषयी काहीच न सांगता आल्यामुळे आपल्या हातातून निघून जातात.
पण हे मुलांच्या लक्षातच येत नाही. ते कसाबसा बायोडाटा लिहितात, तेच ते शब्द, ज्यातून त्या विद्यार्थ्याच्या क्षमतांविषयी, त्याच्या ध्येयाविषयी काहीच कळत नाही. 

त्यात बर्‍याचदा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा शॉर्टटर्म असतो. जेव्हा कंपनी एखाद्या उमेदवाराला निवडते तेव्हा ती अर्जंट जॉब देत नसते, त्या उमेदवाराला एक करिअर म्हणून एक संधी-पर्याय देत असते. आणि विद्यार्थ्यांचा/उमेदवारांचा दृष्टिकोन फक्त जॉब . मिळवणं एवढाच असेल तर त्याच्याऐवजी लॉँग टर्म विचार करणार्‍या उमेदवाराला अर्थात करिअरचा विचार करणार्‍या उमेदवाराला कंपनी जास्त पसंती देते.
पण करिअर करायचं म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर प्रथम स्वत:ला समजून घेणं आवश्यक आहे.

मी एखाद्या तरुणाला मुलाखतीमध्ये त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत हे विचारतो तेव्हा तो काही तरी टिपीकल उत्तरं देतो. पण या गोष्टी तुझी स्ट्रेंथ आहे असं का वाटतं या प्रश्नावर त्यांना काहीच उत्तर देता येत नाही. कारण, स्वत:विषयी काही माहितीच नसते.

चांगलं कम्युनिकेशन स्किल ही माझी स्ट्रेंथ आहे, लीडरशिप ही माझी स्ट्रेंथ असं जेव्हा उमेदवार सांगतो तेव्हा ती स्ट्रेंथ त्याला जस्टीफाय करावी लागते. तेच अनेकांना जमत नाही.

अनेकांना हमखास विचारलं जातं, स्वत:त काय सुधारणा करायला आवडेल? बरेच जण तर गप्पच होतात, ट्रान्समध्ये जातात. कारण त्यांनी याचा कधी विचारच केलेला नसतो. मग मी इमोशनल आहे, मी मनाला फार लावून घेतो किंवा मी कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. (फिअर टू से नो) यासारखी छापील उत्तरं दिली जातात.

तसं पाहता जगातील शंभर टक्के लोक इमोशनलच असतात. हिटलरसुद्धा इमोशनलच होता. इमोशनल असणं हा काही वीकनेस असू शकत नाही. पण हे समजूनच न घेता काहीबाही सांगून टाकलं जातं. 
म्हणून सर्वप्रथम एखाद्या जॉबसाठी अप्लाय करण्याच्या आधी स्वत:बद्दल विचार करणे, स्वत:ला समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

खुद के गिरेबान मे देखना भी सिखो दोस्तो!

(लोकमत, २१ जाने २०१४)

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

मुलाखत घेणारे अभ्यासापलीकडचे भलतेच प्रश्न का विचारतात?

एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो. एखादा उमेदवार निवडताना, त्याच्यात तुम्ही एच आरवाले काय बघता? या प्रश्नाचं उत्तर खूपदा परिस्थितीवर अवलंबून असतं. परिस्थिती म्हणजे आम्ही कोणत्या जॉबसाठी उमेदवार बघतो आहोत इथपासून ती विशिष्ट व्यक्ती आमच्या कंपनी कल्चरमध्ये फिट होऊ शकेल का इथपर्यंत सर्व काही असू शकतं.

ज्या पदासाठी निवडायचं त्यासाठीच्या अपेक्षा तो उमेदवार पूर्ण करू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न मुलाखत घेणार्याच्या डोक्यात अग्रस्थानी असतो. उदाहरणार्थ, मला एखाद्या फॅक्टरीसाठी दहा-बारा कामगारांना व्यवस्थित मॅनेज करणारा शिफ्ट सुपरवायझर हवा असेल, तर मी त्या उमेदवारात काय बघेन? 

समजा, एखाद्या कॉलेजमधून मी विद्यार्थ्यांना सिलेक्ट करत असेन, तर मी त्याला डायरेक्ट सुपरवायझरची जबाबदारी देणार नाही, परंतु त्याच्यातली स्किल्स पाहून मला असं वाटू शकतं की, हा किंवा ही उमेदवार पुढे ‘सुपरवायझर’ म्हणून चांगला तयार होऊ शकेल. मग मुलाखत घेताना मी मार्क्स बघेन, शैक्षणिक रेकॉर्ड तपासेन पण त्याहीपेक्षा त्याचं व्यक्तिमत्त्व दहा-बारा कामगारांना मॅनेज करू शकेल, अशा पद्धतीने मी डेव्हलप करू शकेल का, तशी धडाडी त्याच्याकडे आहे का, शिकण्याची, माणसं सांभाळण्याची, गोड बोलून काम करून घ्यायची हातोटी आहे का हे सारं प्राधान्यानं तपासून पाहीन. नुस्ते मार्क चांगले असतील आणि हे सारं नसेल तर मला त्याचा काय उपयोग? म्हणून तर नोकरीसाठीच्या मुलाखतीत टेक्निकल ज्ञानापेक्षा अन्य प्रश्न जास्त विचारले जातात. अनेक मुलं तिथंच कमी पडतात. त्यांना कळतच नाही की अभ्यासापलीकडचे, भलतेच प्रश्न का विचारताहेत?? पण त्या उत्तरातूनच उमेदवारातला स्पार्क (चुणूक) दिसतो. आणि स्वत:तला स्पार्क, प्रगतीसाठी तो वापरण्यासाठी मेहनत, हे सारं ‘एम्प्लॉयबिलिटीत’ येतं. 

दरवर्षी जवळपास पाच लाखांच्या आसपास विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडतात आणि मार्केटमध्ये जवळपास ८ ते १0 लाखांच्या आसपास नोकर्या तयार होत असतात, अशी एक आकडेवारी सांगते. तरीही आपल्यासमोर बेरोजगारांची संख्या वाढते आहे. हे सगळं बदलायचं असेल तर अर्थात सरकार, शैक्षणिक संस्था यांनी प्रयत्न करणं अपेक्षित असलं, तरी आपण स्वत:ही नव्या काळातली कौशल्यं शिकूनच घ्यायला हवीत. मागील आठवड्यात मला नुकत्याच बी.ई. झालेल्या एका विद्यार्थ्याची मेल आली. त्यानं बायोडाटा अँटॅच करून पाठवत लिहिलं होतं, "Dear Sir, PFA and do the needful." हे असं उद्धट वाक्य वाचून कुणीही सुज्ञ एचआरवला त्याला मुलाखतीलासुद्धा बोलावणार नाही. 

पण का? त्याविषयी पुढील भागात. 


(लोकमत, १७ जाने २०१४)

शिक्षण आहे, मग जॉब का नाही?


२0१४ या नव्या वर्षात देशात सुमारे साडेआठ लाख नव्या रोजगार संधी निर्माण होतील, हे ताजं भाकीत वाचल्यापासून या संधी आपल्या दिशेने ओढून घेण्यात किती तरुण-तरुणींना यश येईल, हाच प्रश्न माझ्या मनात सारखा घोळतो आहे.
उत्तम क्वालिफिकेशन. आतापर्यंत बरेच इंटरव्ह्यू देऊन झालेले, पण जॉबचा पत्ता नाही. 
आपलं नेमकं चुकतं काय हे कळत नाही आणि दर इंटरव्ह्यूमध्ये दांडी उडणं टळत नाही.- ही परिस्थिती कितीतरी जणांची असते.




उच्चशिक्षित असूनही मनासारख्या नोकरीपासून दूर असलेल्या तरुणांचा मुख्य प्रश्न असतो तो एम्प्लॉयबिलिटीचा.. म्हणजे नोकरी मिळण्यास पात्र अशा अधिकच्या व्यावहारिक कौशल्यांचा.
विद्यार्थी शिकतात, मोठमोठय़ा पदव्या घेतात. पण जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र खूप कमी विद्यार्थी पुढे सरकू शकतात. हे का होत असावं?

जॉब मार्केटला दोष देऊन मोकळं होणं सोपं असतं, पण त्याने आपला व्यक्तिगत प्रश्न कसा सुटेल?
एकतर आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. भारतातही भरपूर संधी उपलब्ध आहेत. 
भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणार्‍या बर्‍याच कंपन्या सक्षम मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत आहेत.
थोडक्यात, नोकरीच्या संधी भारतात उपलब्ध आहेत पण ही संधी साधू शकेल, असं तरुण मनुष्यबळ मात्र पुरेसं नाही. हे त्रांगडं का होतं?



- गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ह्यूमन रिसोर्सेसमध्ये (म्हणजे नव्या कर्मचार्‍यांची निवड करण्याची जबाबदारी असलेला मनुष्यबळ विकास विभाग काम करतानाचा माझा अनुभव एकच सांगतो : तरुण उमेदवारांकडे पदवीचे कागद असतात, पण परीक्षेत एकेक जास्तीचा टक्का मिळवण्यासाठी जीवाचं रान करणारे विद्यार्थी व्यावहारिक कौशल्यं शिकण्याला मात्र कायमच ऑप्शनमध्ये टाकून मोकळे होतात. ही अधिकची कौशल्यं म्हणजेच एम्प्लॉयबिलिटी. आपली शिक्षणपद्धती एम्प्लॉयबिलिटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. विद्यार्थी खूप हुशार असला तरी ती शैक्षणिक हुशारी व्यावहारिक विद्ववत्तेमध्ये कशी परावर्तित करता येईल, याचं ज्ञान दुर्दैवाने देण्यात येत नाही. अर्थात, हे खूप कठीण आहे, असंही नाही. फक्त गरज असते थोडे अधिकचे कष्ट घेण्याची. 


या लेखमालेतून आपण त्याबद्दलच बोलूया.

(लोकमत - 10 जानेवारी 2014)