सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

शिक्षण आहे, मग जॉब का नाही?


२0१४ या नव्या वर्षात देशात सुमारे साडेआठ लाख नव्या रोजगार संधी निर्माण होतील, हे ताजं भाकीत वाचल्यापासून या संधी आपल्या दिशेने ओढून घेण्यात किती तरुण-तरुणींना यश येईल, हाच प्रश्न माझ्या मनात सारखा घोळतो आहे.
उत्तम क्वालिफिकेशन. आतापर्यंत बरेच इंटरव्ह्यू देऊन झालेले, पण जॉबचा पत्ता नाही. 
आपलं नेमकं चुकतं काय हे कळत नाही आणि दर इंटरव्ह्यूमध्ये दांडी उडणं टळत नाही.- ही परिस्थिती कितीतरी जणांची असते.
उच्चशिक्षित असूनही मनासारख्या नोकरीपासून दूर असलेल्या तरुणांचा मुख्य प्रश्न असतो तो एम्प्लॉयबिलिटीचा.. म्हणजे नोकरी मिळण्यास पात्र अशा अधिकच्या व्यावहारिक कौशल्यांचा.
विद्यार्थी शिकतात, मोठमोठय़ा पदव्या घेतात. पण जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र खूप कमी विद्यार्थी पुढे सरकू शकतात. हे का होत असावं?

जॉब मार्केटला दोष देऊन मोकळं होणं सोपं असतं, पण त्याने आपला व्यक्तिगत प्रश्न कसा सुटेल?
एकतर आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. भारतातही भरपूर संधी उपलब्ध आहेत. 
भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छिणार्‍या बर्‍याच कंपन्या सक्षम मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत आहेत.
थोडक्यात, नोकरीच्या संधी भारतात उपलब्ध आहेत पण ही संधी साधू शकेल, असं तरुण मनुष्यबळ मात्र पुरेसं नाही. हे त्रांगडं का होतं?- गेली अनेक वर्षं वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ह्यूमन रिसोर्सेसमध्ये (म्हणजे नव्या कर्मचार्‍यांची निवड करण्याची जबाबदारी असलेला मनुष्यबळ विकास विभाग काम करतानाचा माझा अनुभव एकच सांगतो : तरुण उमेदवारांकडे पदवीचे कागद असतात, पण परीक्षेत एकेक जास्तीचा टक्का मिळवण्यासाठी जीवाचं रान करणारे विद्यार्थी व्यावहारिक कौशल्यं शिकण्याला मात्र कायमच ऑप्शनमध्ये टाकून मोकळे होतात. ही अधिकची कौशल्यं म्हणजेच एम्प्लॉयबिलिटी. आपली शिक्षणपद्धती एम्प्लॉयबिलिटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. विद्यार्थी खूप हुशार असला तरी ती शैक्षणिक हुशारी व्यावहारिक विद्ववत्तेमध्ये कशी परावर्तित करता येईल, याचं ज्ञान दुर्दैवाने देण्यात येत नाही. अर्थात, हे खूप कठीण आहे, असंही नाही. फक्त गरज असते थोडे अधिकचे कष्ट घेण्याची. 


या लेखमालेतून आपण त्याबद्दलच बोलूया.

(लोकमत - 10 जानेवारी 2014)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: