मंगळवार, २ सप्टेंबर, २०१४

सांगकाम्यांना नो एण्ट्री

काम दिसतं तुम्हाला? कुणी कामच सांगितलं नाही म्हणून तुम्ही काहीच करत नाही?

इनिशिएटिव्ह हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा.

‘तू स्वत: काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत का?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. हे इनिशिएटिव्ह कॉलेजमध्ये, सोसायटीमध्ये, कुटुंबामध्ये कोठेही असू शकतात. या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवाराकडून काढलं जातं. मुळात विद्यार्थी उमेदवार हा इनिशिएटिव्ह घेणारा असला की, संस्थेची बरीचशी कामं सोपी होतात. मराठीमध्ये या शब्दाला फार तर आपण ‘पुढाकार’ म्हणू शकू. परंतु या शब्दाचा अर्थ निव्वळ पुढाकार नव्हे.

एखादी घटना योग्य पद्धतीनं विश्लेषित करून, दुसर्‍यांची वाट न बघता, स्वतंत्रपणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या प्रवृत्तीला/गुणाला आपण ‘इनिशिएटिव्ह’ म्हणू शकतो. कर्मचार्‍यांचा हाच गुण महत्त्वाचा ठरतो. आताच्या आधुनिक कार्यपद्धतीमध्ये ‘सांगकाम्या’ कर्मचारी कोणालाच नको असतो. कामाच्या जागी बर्‍यापैकी गुंतागुंत असते. बर्‍याचदा स्वत:ला काही निर्णय घ्यावे लागतात. अशावेळेस इनिशिएटिव्ह घेऊन एखादी सिस्टिम डेव्हलप करणारा, सुधारणा करणारा उमेदवार केव्हाही सरस ठरतो.

एखादी कृती करण्याची गरज असताना, ती कृती दुसर्‍यांकडून अपेक्षित करणं केव्हाही चुकीचं आहे. उदा. आपण आताच्या राजकीय परिस्थितीबद्दल खूपदा चर्चा करतो, परंतु ही राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. साधं मतदार यादीत नाव नसेल तर मतदार यादीत नाव घालण्यासाठी प्रयत्नही करत नाही. एका कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला जेव्हा वाटलं की, आपण काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा त्यानं समविचारी मित्रांना एकत्र आणून आपल्या भागामध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला. हे त्याला कोणी सांगितलं नाही, पण त्याच्या मनातून काहीतरी करण्याची भावना होती. बर्‍याचदा आपण एखाद्याला फॉलो करतो, परंतु गरज असेल तेव्हा बदलासाठी इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक ठरतं.
असे तुमचे इनिशिएटिव्ह तुम्ही सांगू शकला, तर तुमच्यात काहीतरी खास दम आहे. पण आपल्या स्वभावात इनिशिएटिव्ह घेणं आहे हे कसं ओळखाल? हा तुमच्यातला गुण मुलाखतकर्ते कसं ओळखतात? तर अगदी साध्या साध्या उदाहरणातून आणि अनुभवातून. तुम्ही विद्यार्थी असाल तर कॉलेजमध्ये काय इनिशिएटिव्ह घेताहात. कर्मचारी असाल तर संस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी काय करताहात हे सर्व योग्य पद्धतीनं सांगता यायला हवं.


जेव्हा मी फ्रेशर्सच्या इंटरव्ह्यूज घेतो, तेव्हा फक्त २0 टक्के विद्यार्थीच असं काहीतरी वेगळं सांगू शकतात. बाकीचे ८0 टक्के गप्प बसतात नाहीतर ओढूनताणून काहीतरी सांगतात. इनिशिएट करायचं म्हणजे काय करायचं हे ठरवायचं कसं, असा प्रश्न जर तुम्हाला पडलाच असेल तर त्याचं उत्तर सोपं. सोसायटीच्या गणपती उत्सवात तुम्ही किती भाग घेतलाय?
सुरुवात तिथूनही करता येतेच.

(लोकमत २१ मार्च २०१४) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: