रविवार, ४ जानेवारी, २०१५

प्रसंगावधान (Presence of Mind) ते आणायचं कुठून?


‘फॅक्टरीज अॅक्टच्या कोणत्या सेक्शन खाली कंपनीच्या संचालकांना अटक होऊ शकते?’ 
-असा एक प्रश्न एका हुशार मुलाखतकर्त्याने नुकत्यात एमबीए झालेल्या हुशार मुलाला विचारला. याचं उत्तर मुलाखतकर्त्याला  कितपत माहिती होतं, माहीत नाही, पण त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं. ‘‘सर,  फ्रॅकली स्पिकिंग मला हा सेक्शन आठवत नाही, पण जर माझं सिलेक्शन  झालं तर कंपनीच्या संचालकांना अटक होणार नाही एवढं परफेक्ट काम मात्र माझं असेल.’’

हे उत्तर चूक होतं की बरोबर, हा प्रश्न वेगळा. पण त्या तरुणानं प्रसंगावधान दाखवून वेळ धकवून नेली. रोजच्या जीवनात घडणा-या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात? त्यातील किती गोष्टी आपल्या मनाप्रमाणो घडतात आणि किती गोष्टी तुमच्यावर प्रभाव गाजवतात याचे एक तुलनात्मक स्टेटमेंट बनवल्यावर आपल्या लक्षात खूप काही विचार येतात आणि एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कॉमनसेन्स आणि प्रसंगावधान. या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीर्पयत निश्चितच घेऊन जाऊ शकतात.

आपल्या रोजच्या जीवनात असंच प्रसंगावधान अपेक्षित आहे. पण सर्वानाच ते जमतं असं नाही. प्रसंगावधान  ही संभाषण चातुर्याची पहिली पायरी आहे. एखाद्या क्रिटिकल परिस्थितीत आपण गोंधळतो, काय करावं नेमकं हेच आठवत नाही. डोक्यात येत नाही तेव्हा हे प्रसंगावधान कामी येतं.

काही लोकांनाच ही कला जमते? पण त्यांनाच का जमते? प्रयत्न केला तर थोडय़ाशा अनुभवानं  तुम्हालाही जमू शकेल. मुळात प्रसंगावधानाची  आवश्यकता कोठे पडते? ती साध्या घटनात फारसं महत्त्व ठेवत नाही, पण अशा बुद्धीचा कस लागतो तो एखाद्या गंभीर घटनेत. खरंतर मोक्याच्या घटनांच्या वेळी तर्कसंगत बुद्धीचा योग्य वेळी वापर करून परिस्थिती निभावून नेणं म्हणजे हे प्रसंगावधान.

प्रश्न आहे ते आणायचं कुठून? दाखवायचं कसं ? एखाद्या घटनेकडे बघताना, एखादी घटना अनुभवताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची कुवत. जॉब करताना आणि करिअरच्या पाय:या चढताना प्रत्येकवेळी अगदी किचकट आणि कठीण पद्धतीनंच प्रश्न सोडवायची गरज नसते.  इंटरव्ह्यू देताना, प्रेङोण्टेशन देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना, एखादी परिस्थिती सांभाळताना ब:याचदा हे प्रसंगावधानच उपयोगी येतं.  तुमच्या अवतीभोवती तुमच्या संबंधित घटना घडते. अगदी स्पंजप्रमाणो ती घटना आणि त्या घटनेमागचं लॉजिक टिपून घेतलं की, तुम्हाला विचारांची संगती लावता येईल.


काही व्यक्ती बोलण्यात चतुर असतात, त्या शाब्दिक कोडी छान करतात, प्रसंगनिष्ठ विनोद करतात. एखादं वातावरण हलकंफुलकं करतात. कारण एखादी विसंगती टिपण्यासाठी आवश्यक असणारी त्यांची निरीक्षणशक्ती अफाट असते. तो त्यांचा स्थायीभाव बनतो, अशा व्यक्तीचं प्रत्येक बोलणं हे त्याचं प्रसंगावधान असतं. नव्या काळात हे शिकावंच लागेल. तर आणि तरच निभाव लागण्याची काही शक्यता आहे.

सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

अरे, काही कॉमनसेन्स आहे की नाही?

 
 कॉमनसेन्स हा शब्द आपण रोजच्या जीवनात नेहमीच वापरतो. हा शब्द आपल्या एवढय़ा जवळचा आहे की एखादी घटना घडल्यावर चटकन आपल्या जिभेवर हा शब्द येतो. 

‘हा कॉमनसेन्सचा भाग आहे. एवढाही कॉमनसेन्स नाही?’ ‘अरे कुठे गेला तुझा कॉमनसेन्स?’ अशासारखी वाक्यं अगदी क्षणाक्षणाला वापरली जातात. दुसर्‍यांच्या कॉमनसेन्सबद्दल असे सर्रास प्रश्न निर्माण करताना, आपला कॉमनसेन्स मात्र आपण खूपदा वापरत नाही.
जे वैयक्तिक संदर्भात होतं तेच कामाच्या, नोकरीच्या जागी हमखास होतं.
कामाच्या जागी बर्‍याच गोष्टी कॉमनसेन्सवर साध्य होऊ शकतात. करता येऊ शकतात. बर्‍याच किचकट प्रश्नांची उत्तरं अगदी साधी असू शकतात. 
पण असतो काय हा कॉमनसेन्स?
एखाद्या गोष्टीचं, घटनेचं सारासार विवेकदृष्टीनं किमान (कमीत कमी) समज वापरून केलेलं विश्लेषण म्हणजे कॉमनसेन्स. 
अवघड प्रश्न हा आहे की, हा कॉमनसेन्स येतो कसा? 
तो येत नाही चटकन, कमवावा लागतो. रोजच्या अनुभवातून, निरीक्षण शक्तीतून आपण हा कॉमनसेन्स कमवत असतो. 

उदाहरणार्थ, आपण पेपरमध्ये फसवणुकीच्या, दुप्पट तिप्पट व्याज देण्याच्या लॉटरी लागण्याच्या, काहीही न करता अमुक लॉटरी लागल्याचे ईमेल्स येण्याच्या प्रकरणात फसलेल्यांच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. आणि अनेकदा शिकलीसवरलेली मंडळीही या सगळ्यात अडकल्याचं वाचतो. 
का होतं असं? असे फसवणुकीचे गुन्हे नेहमी घडत असताना, आपण वाचत असतानाही लोक का अडकतात या ट्रॅपमध्ये?  आपल्याला नेहमी वाटतं की, जातो कुठं यांचा कॉमनसेन्स? 
म्हणजेच काय कॉमनसेन्स कमवायला नेहमी स्वत:लाच आलेल्या अनुभवाची गरज असते, असं नाही. 
अनेकांचं ऐकून, वाचून, मिळालेली माहिती योग्यवेळी पूर्ण विचारांती वापरू शकतो. तोच हा कॉमनसेन्स.
काही घटना वारंवार घडत असल्या तर मागे आपण अशा परिस्थितीत कसे वागलो होतो हे आठवता येतं. त्यातून आपण स्वत:त सुधारणा करतो. करू शकतो. म्हणजे अर्थात सुधारणा करण्याची तयारी हवी.
रोजच्या आयुष्यात घडणार्‍या खूप घटना असतात. अगदी छोट्या छोट्या. ते छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला असा समजेवर आधारित कॉमनसेन्सच वापरावा लागतो.
‘एमबीए’च्या कोर्समध्ये हा कॉमनसेन्स मात्र शिकवला जात नाही.
तो आपल्यालाच कमवावा लागतो. पण अनेकांना वाटतं की, आपण एमबीए आहोत, आपल्याला काय असले प्रश्न विचारतात?
आता हेच पहा, तुम्ही मुलाखतीला गेलात, मुलाखत सुरू आहे, तुमचा मोबाइल बंद करायचा तुम्ही विसरलात आणि अचानक तुमच्या मोबाइलची रिंग वाजली तुम्ही काय कराल? 
- कधी कधी मुलाखतकर्ता तुमचा कॉमनसेन्स बघण्यासाठी एखादी अशीच परिस्थिती निर्माण करतो. आजकाल अनेक ऑफिसमध्ये ऑफिसबॉय वगैरे नसतात. त्यामुळे चहा, कॉफी स्वत:च घ्यावी लागते. अशा वेळेस एखादा मुलाखतकर्ता तुम्हाला कॉफी ऑफर करत असेल तर काय कराल?
जर तुम्ही खरंच मुलाखतीची नीट तयारी केलेली असेल, तर हे प्रकरण हॅन्डल करणं फारसं कठीण नाही. 
त्यासाठी काही गोष्टी तरी नक्की करता येतील.
तुम्ही मुलाखतीच्या अर्धा तास आधी तरी त्या ऑफिसमध्ये हजर रहायला हवं. तुमच्या निरीक्षणातून ऑफिसचं कल्चर, कामाची पद्धत, लोकांच्या वागण्यातून तुम्ही काही अंदाज लावू शकता.

जर ऑफिसमध्ये इनफॉर्मल कल्चर असेल, ऑफिसबॉईज नाहीत इथं कामाला असं लक्षात आलं तर तुम्ही कॉफी अगदी नम्रपणे नाकारू शकता. 
बर्‍याचदा कॉफी ऑफर करणं हा निव्वळ एक फॉरमॅलिटीचा भाग असू शकतो.
अशा वेळेस आपण कसं वागायचं हे आपला कॉमनसेन्सच आपल्याला सांगतो. तो सदासर्वकाळ एकसारखा नसतो आपण तो डेव्हलप करू शकतो. तो कसा करायचा?

तर त्यासाठी रोजच्या रोज अगदी झोपेतून उठल्यापासूनच्या घटनांचा अभ्यास करायला हवा, आपण कसे वागतो, कसे वागू शकलो असतो हे जरा नीट बारकाईनं पाहिलं तर जमू शकेल.