ऑफिस मधील बरेचसे तणाव हे परिस्थितीचे भान न आल्यामुळे वाढतात. जवळपास ५०% कर्मचारी ऑफिस मधील तणावाने बेजार आहेत. तसेच आधुनिक जीवन पद्धतीमुळे वैयक्तिक आयुष्यात स्वतःबद्दल असणाऱ्या अवाजवी अपेक्षा अनावश्यक तणावाला आमंत्रण देत आहेत. जीवनमान उंचावल्याचा अभिमान प्रत्येकाला असतो, परंतु महागडी घरे, मोठमोठ्या गाड्या, महागडे गॅझेट्स हे आपल्या आयुष्याचा भाग झाले आहेत. त्याशिवाय दुसऱ्यांसोबत तुलना महागात पडत आहे. सोशल मीडिया वर महागड्या टूर चे आणि संपत्तीचे प्रदर्शन लोकांना आवडते. अर्थात ह्या सर्वांचे EMI भरत असतानां, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, ऑफिस मध्ये जॉब टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि बॉस ची लाचारी हे सर्व कार्य संस्कृतीचे महत्वाचे भाग झाले आहेत.
अर्थात, तणाव संपूर्ण जीवनात व्यापून गेला आहे. कोविड१९ मुळे जवळपास ७० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही दिवस नवलाचा असणारा वर्क फ्रॉम होम चा आता कंटाळा आला आहे. एका सर्वे नुसार कामाच्या निमित्ताने होणार विमानाचा प्रवास, ते पंचतारीक हॉटेल मध्ये राहणं लोक आता मिस करू लागली आहेत. हे सर्व कर्मचारी एन्जॉय करत होते, ते सर्व थांबले आहे. आता नोकरी टिकवून ठेवणे हि प्रायोरिटी झाली आहे. घरी सतत असल्यामुळे ह्या तणावात भर पडत आहे. लोकांना नाते सांभाळताना कसरत करावी लागत आहे. नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि आता प्रत्येकाला भविष्याची चिंता सतावत आहे.
त्यात अतिशय वेगाने होणारी तांत्रिक प्रगती माणसाला बाजूला टाकत आहे.
ह्या सर्व परिस्थितीचे वर्णन खालीलप्रमाणे करत येईल.
१) कमालीची अनिश्चितता आणि भविष्याबद्दल न करता येणारी भाकिते,
२) त्यामुळे होणार भावनिक कोंडमारा,
३) अशी परिस्थिती कशी सांभाळावी ह्याचे अज्ञान,
ह्या तीन गोष्टी, माणसाच्या भावनिक प्रतिक्रियेवर प्रभाव टाकत असतात. या स्थितीत आपले तर्क, समस्येचे निराकरण आणि योग्य विचार करण्याची आपली क्षमता क्षीण होऊ शकते.
मग ह्या सर्व प्रकारची काहीतरी प्रतिक्रिया येणारच. आणि हि प्रतिक्रिया, राग, क्रोध, निराशा, दुसऱ्याबद्दलचा मत्सर, भीती, आणि टोकाच्या परिस्थितीत पॅनिक अटॅक च्या रूपात बाहेर पडते. असे म्हणतात कि रागीट माणसे मुळात घाबरलेली असतात आणि क्रोध हा त्यांची संरक्षण यंत्रणा असते. दुःखी, असमाधानी, निराश लोकांमागे काहीतरी इतिहास असतो, समाज, संगोपन, आई वडिलांचा, नातेवाईकांचा, शिक्षकांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळे जे आपण बघतो, ऐकतो, अनुभवतो त्या आधारावर आपली प्रतिक्रिया असते. कदाचित एखाद्या विशिष्ट घटनेत रागाने आपली कामे झालेली असतील किंवा त्यामुळे काहीतरी समाधान मिळालेले असेन. परंतु आपल्या मेंदूमध्ये त्याचीच नोंद झालेली असते आणि प्रत्येकवेळी तोच अनुभव आपण एकच उपाय म्हणून वापरतो.
हि प्रतिक्रिया कशी असावी, हे मात्र अनुभवाने येते. रागाचे, क्रोधाचे, व्यवस्थापन कसे करावे हा मात्र नेहमीच विषय असतो. आपली बुद्धिमत्ता कितीही स्ट्रॉंग असली, माणूस कितीही हुशार असला तरीही हे सांभाळता येत नाही. त्यासाठी भावनेवर नियंत्रण असावे लागते. त्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता कमवावी लागते. ह्या भावनिक बुद्धिमत्तेचे चार भाग आहेत.
१) स्वतःबद्दलचे आत्मभान: आपण स्वतःला किती ओळखले हा गहन प्रश्न आहे. जगाला, इतरांना समजून घेण्याच्या नादात आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करत असतो. अध्यात्मिक जगात, ह्या आत्मभानाला अतिशय महत्व आहे. आपला स्वभाव कसा आहे, स्वतःचे गुण, दुर्गुण कोणते आहेत, आपल्या भावनिक प्रतिक्रिया कश्या असतात हे सर्व समजून घेतले तर आयुष्याचा प्रवास खूप सोपा आहे. अंतरंग समजण्याची कुवत प्रत्येकाची असते परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. स्वतःला केव्हा राग येतो हे समजले तरी खूप. ह्या प्रक्रियेत फक्त समजावून घेणे महत्वाचे आहे.
२) सामाजिक, अथवा इतराबाबत असणारी जागरूकता: आपण स्वतःला समजून घेतले, मग पुढे काय? येथे आपल्याला फक्त इतरांच्या जागी स्वतःला समजून विचार करावा लागेल. एखादा काही बोलला असेन, बॉस ने रागावले असेन, त्यामागे काहीतरी परिस्थिती आणि त्या व्यक्तीची मानसिक अवस्था असते. कदाचित बॉस ला त्याच्या बॉस ने रागावले असेल आणि तीच राग आता आपल्यावर तो काढत असेल. सह-अनुभूती हा शब्द येथे योग्य आहे. लोकांच्या सामाजिक जाणीव, त्यांच्या चालीरीती आणि विशिष्ट व्यक्तीचे अनुभव आपला इतरांबद्दल ची जागरूकता वाढवत असते. येथे लोकांना समजावून घेणे महत्वाचे असते.
३) स्वव्यवस्थापन: येथे येते ते स्वतःच्या भावनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन जे सर्वात कठीण काम आहे. एखादी घटना घडली, त्याचा प्रभाव आपल्यावर होणार, परिस्थिती वाईट असेल तर आपल्या भावना ट्रिगर होणार आणि रिस्पॉन्स म्हणून आपण रागावणार, निराश होणार. मग आपण त्यावर कोणत्यातरी स्वरूपात प्रतिक्रिया देणार. आपल्या भावना सर्वप्रथम ओळखणे महत्वाचे आहे. कारण राग हि भावना नाही, ती प्रतिक्रिया आहे. भावना कदाचित निराशा असू शकेल आणि त्याची प्रतिक्रिया रागाद्वारे बाहेर पडत असेल. प्रश्न आहे ती भावना आपण कशी ओळखतो.
४) संबंधांचे (नाते) व्यवस्थापन: येथे इतरांची भावनिक स्थिती समजून घेणे, त्यांचा भावनिक प्रतिसाद ओळखणे आणि त्यांच्याशी सामोरे जाण्यासाठी धोरण बनविणे ह्या गोष्टी येतात. आपण आपल्या भावना दाबून ठेवू शकत नाही, पण त्या नियंत्रित करू शकतो. तसेच आपण इतरांना त्या नियंत्रिक करण्यासाठी मदद करू शकतो.
कल्पना करा की आपला मेंदू धरणाप्रमाणे आहे, पाण्याचा एक मोठा साठा ह्या धरणात (या रूपकात, पाणी आपला राग आहे). कधीकधी, धरणावर लहान क्रॅक आणि लहान गळती सुरु आहे आपल्या लक्षात येते, जे आपण सहजपणे दुरुस्त करू शकता. परंतु आपण पुरेसे लक्ष दिले नाही तर धरण फुटेल.
जर आपला राग तो फुटण्यापूर्वी पकडला तर आपण त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असू. परंतु धरण फुटण्याची वाट बघितली तर त्याचा परिणाम भयानक होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर रागाची भावना आणि तो कश्यामुळे येतो ते भावनिक ट्रिगर लवकर पकडणे शिकणे सर्वात महत्वाचे कौशल्य आहे.
ताणतणाव, राग लोभ, आशा निराशा, सुख दुःख हे आयुष्याचा भाग आहेत. ह्या भावना आहेत. महत्वाचे आहे अश्या प्रकारच्या भावना उद्दीपित का होतात ते समजावून घेणे. आणि मग त्यावर योग्य तो प्रतिक्रिया /प्रतिसाद देणे. बरेचदा आपल्या भावना ह्या इतरांच्या चुकीमुळे जागृत होतात. इतरांच्या वागणुकीवर आपले नियंत्रण नाही, परंतु आपल्या आहे. त्यामुळे एखाद्या वागणुकीला, परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपणच ठरवणे उत्तम. नकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक प्रतिक्रियेत परावर्तित कशी करता येईल हे शिकणे म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन.
विनोद बिडवाईक
(लेखक ह्यूमन रिसोर्स आणि व्यवस्थापन तज्ज्ञ असून अल्फा लावल ह्या बहुराष्ट्रीय संस्थेत उपाध्यक्ष ह्या पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांची व्यवस्थापन आणि मानव संसाधन ह्या विषयावर इंग्रजी आणि मराठीत ६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.)
(हा लेख १९ नोव्हेंबर २०२० रोजी दैनिक लोकांमध्ये प्रसिद्ध झाला आहे.)
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)
1 टिप्पणी:
खूप छान 👌
टिप्पणी पोस्ट करा