शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

शो, युवर अॅटिट्यूड!

·      

आयुष्यात
यशस्वी होण्यासाठी तुमचा  अॅटिट्यूड महत्वाचा ठरतो. एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे, उपक्रमाचे, कल्पनेचे तुम्ही कशा पद्धतीने मुल्यमापन करता, या गोष्टींवर तुमचा हा अॅटीट्यूड अवलंबून असतो.


हल्ली बर्याच संस्थांतले मॅनेजमेण्टवाले खुलेआम म्हणतात, ‘‘आम्ही अॅटीट्यूडू बघून उमेदवाराला नोकरी देतो. कौशल्यं त्याला केव्हाही शिकवता येतील! ’’

मग तुमचा हा अॅटिट्यूड ते कसं ओळखतात? 

तुमचा अॅटीट्यूड हा तुमच्या वागण्यातून संभाषणातून जाणवतच असतो. 
तो सकारात्मक असू शकतो, नकारात्मकही असू शकतो. बोलताना चटकन लक्षात येते.

काही व्यक्ती आयुष्यात फारच नकारात्मक असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना वाईट गोष्टीच दिसतात. घटनेचं नकारात्मक विश्लेषण करण्यातच त्यांना मजा येते. ज्या त्या गोष्टीला ते नावंच ठेवतात, नाकं मुरडतात. अर्थात हा अॅटीट्यूड त्यांच्यावर झालेल्या संस्कारातूनही तयार झालेला असतो. 

मुलाखतीच्या वेळेस एखादा प्रश्न असा येतो की त्याचं उत्तर तुमचा अॅटीटयूड सांगून जातो. 
‘‘अशी एखादी घटना सांग की जेव्हा कामात अपयश आलं..’’ 
बरेचदा  अनेक उमेदवार आपल्या अपयशाबद्दल सांगायला तयारच नसतात. त्यांना वाटतं की आपलं अपयश सांगितलं तर, आपली कमतरता पुढे येईल. इथेच खरा अॅटीट्यूडचा प्रश्न येतो. 

एखादा उमेदवार या अपयशातून काय शिकला, आपल्या व्यक्तीमत्वात, विचारात त्याने काय बदल करुन घेतला हे समजून घेण्याचा  प्रयत्न मुलाखत घेणारा करत असतो. अपयश हे महत्वाचे नसते, महत्वाचे असते, तुमची एखाद्या घटनेतून शिकण्याची,अपयशातून उभारण्याची प्रकृत्ती.

त्यातून तुमचा अॅटीट्यृूड तयार होत असतो. आपण जे बघतो, जे अनुभवतो, त्यावरुन हे सर्व अनुभव, निरिक्षण तुम्हाला काही चांगलं देत असतील तर त्याचा अवश्य विचार करा. एखाद्या गोष्टीबद्दलची निव्वळ नकारात्मकता ही त्या प्रसंगाची, घटनेची, व्यक्तीची पृूर्ण ओळख होऊ शकत नाही.

‘‘एखाद्या वेळी तुम्ही तुमच्या बॉसची क्रिटिकल कॉमेंट ऐकली का?’’

असा प्रश्न कुणी विचारला तर, जसं हो नाही उत्तर देता येईल, तसंच त्या क्रिटिकल कॉमेण्टमुळे काय सुधारणा केली हे ही सांगता येईल.

तसाच आणखी एक प्रश्न.
‘‘हा तुमचा प्रोजेक्ट जर तुमच्या गाईडने नाकारला तर काय कराल?’’ 
हा साधा प्रश्न.
‘‘मी तो का नाकारला जातोय हे बघेल आणि गाईडच्या अपेक्षा समजून घेऊन नंतर निर्णय घेईल’’ हे एक उत्तर.
दुसरं असंही म्हणता येईल,
‘‘नाईलाज आहे, मी काय करु शकतो, गाईड जे सांगेल ते मला करावे लागेल’’ !

तुमचं उत्तर कुठलं तुम्ही ठरवा, कारण त्यावर तुमचा अॅटिट्यूड ठरेल. आणि तुमच्या अॅटिट्यूडवर तुमच्या संधीच्या शक्यता ठरतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: