· पॅशन काय आहे तुमचं?
हा प्रश्न कधी स्वत:ला विचारला आहे का?
नोकरी मागण्यासाठी येणार्या स्मार्ट-हुशार मुलांचाही या प्रश्नाशी काही संबंधच नसतो. त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा आणि पॅशनचा संबंध ते जोडतात, तसं सांगतातही.
पण ते नेहमी खरंच असतं असं नाही. अनेक जण तर पॅशन म्हणून काहीतरी थातूरमातूर सांगत वेळ मारून नेतात. पण आपलं पॅशन काय याचा त्यांनी काही विचारच केलेला नसतो.
खरंतर ज्यानं त्यानं आपलं पॅशन काय हे जरा तपासायलाच हवं. पॅशन या शब्दाला आपण ‘झपाटलेपण’ असं म्हणू. ते जे आपलं झपाटलेपण आहे किंवा असतं ते आपल्या वृत्तीत दिसायला हवं, ते उपजत आहे असं वाटायला हवं.
अमुक झालं म्हणून मी कमी झपाटलो, जास्त झपाटलो असं कधीच असू शकत नाही. असलाच तर माणूस झपाटलेला असतो किंवा नसतोच. आपण व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून जे निवडतो त्याच्यात आलं पाहिजे. जगलं पाहिजे, तर आपण इतरांपेक्षा वेगळे दिसतो. वेगळं काहीतरी करतो. पण म्हणजे काय, असा प्रश्न काही जणांना पडेलच. कॉलेजमध्ये आल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत टाइमपास करता, तेव्हा सारं विसरून एन्जॉय करता, तेही एकप्रकारचं झपाटलेपणच असतं. तेच आणि तेवढंच झपाटलेपण तुमच्या शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी जर तुमच्यात असेल तर आजच्या घडीला तुम्हाला संधीची कमी नाही.
दुर्दैवानं मुलाखतीच्या वेळेस आम्हाला हे झपाटलेपण, हे पॅशन, काहीतरी करण्याची धमक, हिंमत खूप कमी मुलांमध्ये दिसते. ‘चलता है’ म्हणत अनेक जण काम करतात. खरंतर बरेच जण स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पात्र असतात. स्पर्धेत सरसही ठरतात. त्यांना कामंही मिळतात, पण आपलं पॅशन काय हेच त्यांना कळत नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी काही जण तर आपलं पॅशन बाजूला ठेवून पैसे कमावून देणारी एखादी डिग्री घेतात, त्यांचा जीव त्या डिग्रीत, त्या कामात नाही हे स्पष्ट दिसतं.

बर्याचदा मी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत बोलतो तेव्हा अनेकांचे चेहरे निर्विकार असतात. वाटतं, या क्लासमध्ये बसलेल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणासाठी पाठवलं आणि शिक्षकांनी वर्गात बसवलं म्हणून ते नाईलाजानं बसलेत. पण त्याच ग्रुपमध्ये २0 % मुलं अगदी पॅशनेटली ऐकत असतात, प्रश्न विचारतात. त्यांच्या प्रश्नातूनही त्यांचं करिअरबद्दल झपाटलेपण दिसतं.
उत्तम संधी आणि उत्तम करिअरही फक्त या २0 टक्के मुलांनाच मिळणार आहे.
स्वत:ला विचारा, तुमचा नंबर या २0 टक्क्यांमध्ये आहे का?