·
दक्षिण आफ्रिकेतल्या जंगलातल्या वाघ आणि हरणाच्या कथेसारखं असतं हे सारं. म्हणजे काय तर रोज भल्या पहाटे वाघ आणि हरीण उठत आणि पळायला लागत. पण दोघांची ध्येयं वेगवेगळी, पळत दोघंही, जिवाच्या आकांतानं पळत, पण ध्येय वेगळं. वाघाला आपल्या पोटासाठी हरणाची शिकार करायची म्हणून तर हरणाला आपला जीव वाचविण्यासाठी पळावं लागायचं.
नोकरदार माणसांचं आयुष्यही असंच असतं. कोणीतरी वाघ असतो, कोणीतरी हरीण असतं. पळापळ मात्र अटळच.
अशा वातावरणात तुम्ही हे सर्व कसं हँडल करता यावर तुमचं यश अवलंबून असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांसोबत काम करताना थोडं कठीण जाऊ शकतं. प्रत्येकाची वागण्याची तर्हा वेगवेगळी असते. काही जण स्वत:चं स्वत:चं बघतात, काही जण सहकार्य करतात, काही जण सहकार्य करण्याचं नाटक करतात. काही जण तुम्हाला उभंही करत नाहीत. अशा एकंदरीत जंगलात तुम्ही तुमचं काम कसं करून घेता अथवा दुसर्याकडून कसं करून घेता हे महत्त्वाचं ठरतं. नव्या काळात तर हे सूत्र फारच महत्त्वाचं ठरत चाललं आहे.
मात्र हे लक्षात न घेता, बरेच विद्यार्थी, उमेदवार आपल्या बायोडाटावर बिनधास्त लिहितात.
Interpersonal Skills. त्याचा अर्थ त्यांना माहितीच नसतो. कुठून तरी कॉपी-पेस्ट करून बायोडाटात लिहून टाकतात.
आणि प्रत्यक्ष प्रश्नात मात्र फसतात.
‘वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या, वेगवेगळी ध्येयं असणार्या लोकांसोबत राहून, त्यांचा विश्वास संपादन करून, कधीतर त्यांना प्रभावित करून तुम्ही तुमचं काम करू शकता का?’ असा प्रश्न विचारला जातो तेव्हा मात्र उमेदवारांकडे त्यांचं उत्तर नसतं. कारण अनेकांनी या सार्याचा काही विचारच केलेला नसतो.
तो करायला हवा. पाण्यात पडल्यावर पोहायला येईल, असं म्हणून नाही चालणार, ते आधीपासूनच शिकायला हवं, तसा निदान विचार तरी करायला हवा.
ऑफिसातलं वातावरण म्हणजे तरी काय मानवी संबंधांचंच जाळं असतं. आयुष्यामध्ये मानवी संबंध कसे प्रस्थापित करता आणि जोपासता, हे खूप फायद्याचं ठरू शकतं. हे मानवी संबंध तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा सिद्ध करत असतात.
तेव्हा लक्षात ठेवा, मुलाखतीच्या वेळेस कम्युनिकेशन स्किल यासंदर्भात काही प्रश्न विचारून मुलाखतकर्ता हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही माणसांशी नक्की कसं वागाल?
तुम्ही जे उत्तर द्याल त्यातून त्याला कळायला हवं की, तुमचा मानवी स्वभावाचा अभ्यास कसा आहे? इतरांचा स्वभाव समजल्यावर तुम्ही कसे वागाल, तुमच्या वागण्यानं समोरच्याला कसं प्रभावित कराल? समोरच्या व्यक्तीच्या स्वभावानुसार तुमचं वर्तन तुम्ही कसं ट्यून कराल?
वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींसोबत आत्मविश्वासानं कसं वागता? स्वत:ची प्रतिमा कशी तयार/निर्माण कराल?
कशा पद्धतीनं आणि किती वेगानं मिक्स अप होऊ शकाल?
आणि मुख्य म्हणजे इतर व्यक्तींशी तुम्ही कसे संबंध जोपासाल?
अर्थात असं समजू नका की, सर्व मुलाखतकर्ता हे सर्व तुम्हाला असे डायरेक्ट प्रश्न विचारेल आणि मग तुम्ही उत्तर द्याल. तो प्रश्न भलताच विचारेल आणि तुमच्या उत्तरावरून तुमच्या या क्षमतेचा अंदाज बांधेल. मुलाखतीत तुम्ही जी उत्तरं द्याल त्यावरून तुमच्या कम्युनिकेशन स्किलचाच नाही तर माणसं जोडण्याच्या कलेचाही अंदाज येईल, नुस्तं बायोडाटात गुड इण्टरपर्सनल स्किल्स असं लिहिलं की काम भागत नसतंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा