आजकालच्या नोकर्या अतिशय ताणतणावाच्या असतात. ऑफिसमध्ये कितीही चांगलं वातावरण असलं तरी एक प्रकारची स्पर्धा कायम असते. कॅन्टीनमध्ये जेवण्याच्या टेबलवर भलेही सगळे सहकारी मनापासून गप्पा मारत असतील; पण कामाचा विषय आला की ती अघळपघळ मैत्री मागे पडते आणि स्पर्धा सुरू होते.
आणि जेथे स्पर्धा असते, तेथे तणाव निर्माण होतोच. प्रत्येक बॉसला स्वत:ची टार्गेट्स असतात. त्यालाही स्पर्धा असतेच. तुमचे सहकारीही त्या स्पर्धेत असतात. अशा वेळेस एक प्रकारचा अस्पष्ट, न दिसणारा तणाव ऑफिसमध्ये तयार होतो.
तो तुमच्याही वाट्याला येतो, प्रश्न एवढाच तो तणाव तुम्ही कसा ‘मॅनेज’ करणार?
हल्ली तर मुलाखतीच्या वेळेसच उमेदवाराची स्ट्रेस हॅण्डल करण्याची क्षमता किती आहे हे तपासलं जातं. प्रश्न एकदम साधा असतो, ‘तुमचा दिवस तुम्ही कसा प्लॅन करता, काय काय करता दिवसभर’, असा एक साधा प्रश्न. तो बरेचदा विचारला जातो, त्यामागे कारण हेच. तो अनुभवी उमेदवारालाही विचारला जातो, ‘‘ऑफिसमध्ये गेल्यावर तुझा दिनक्रम कसा असतो, हे जरा सांगशील?’’
या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देता यावरून बर्याच गोष्टी कळतात. तुमचं वेळेचं व्यवस्थापन चांगलं असेल, तर तुम्ही कामाचं व्यवस्थापनही चांगलं करू शकता. त्यातून तुमची कामाची शिस्त आणि तुमची ताण घेण्यादेण्याची कुवत समजते. अनेकांना आपल्या कामाची प्रायॉरिटी काय आहे हेच बरेचदा समजत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक गोष्टी तातडीच्या होऊन जातात. आणि ह्या तातडीच्या गोष्टी कशाबशा पूर्ण करताना तणाव निर्माण होऊन तुमच्याकडून चुका होतातच.
दुसरा तणाव हा नातेसंबंधातील गडबडीने येतो. बर्याचदा चुकीच्या माहितीमुळे अथवा गैरसमजामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. काही वेळेस दोन व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामुळे तणाव निर्माण होतो.
समजा तुमचा एक सहकारी अतिशय अँग्रेसिव्ह आहे आणि तुमचा स्वभाव साधासरळ आहे, तुम्ही तुमचे शब्द तावून सुलाखून वापरता आणि तुमचा सहकारी एकदम ‘बोल्ड’ आहे. तुम्ही दोघे एका ‘प्रोजेक्ट’वर काम करता. तुम्ही दोघेही सारखेच काम करता, पण तो बोलका असल्यामुळे नेहमी ‘व्हीजिबल’ असतो. अशावेळेस कधीतरी तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड तणावाचं कारण होऊ बसतो.
हे सर्व तुम्ही कसं मॅनेज कराल? कामाचा तणाव, सहकार्यासोबत वागताना निर्माण होणारा तणाव, बॉसने झापल्यावर निर्माण होणारा तणाव, ऑफिसमधील वातावरणामुळे तयार होणार तणाव, असे बरेचसे तणाव तुमच्या कामावर आणि प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. हे सर्व कसं हॅण्डल करायचं याची उत्तरे वेगवेगळी आहेत. त्या त्या वेळच्या सिच्युएशननुसार तो तो ताण हाताळावा लागतो. अवघड असतंच, पण अशक्य नाही.
अनेकदा तर आपल्या मनातल्या भीतीमुळे अथवा अकारण चिंतेमुळे जास्त तणाव निर्माण होतो. समजा मुलाखतीत विचारलंच तुम्हाला की, स्ट्रेस कसा हॅण्डल कराल तुम्ही?
तर खुशाल सांगावं, ‘‘मी परिस्थितीचा विचार करेन, वाईटात वाईट काय होईल याचा अंदाज घेईन, जे होईल ते स्वीकारण्याची तयारी करेल, पण जे वाईट होऊ शकतं ते टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन !’’
- हे एक ‘स्टॅण्डर्ड’ उत्तर तुम्हाला देता येईल. शेवटी अशा अवघड परिस्थितीतून बाहेर पडतच तर तुम्ही तुमचं ‘मेटल’ सिद्ध करत असता ना?
कधी कधी ‘‘स्ट्रेस’’ भी अच्छा होता है!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा