जे रोबोटला येतं, तेवढंच तुम्हालाही येतं, मग तुमची नोकरी जाणार..
गेल्या महिन्यात एका बातमीनं उद्योगजगतात बरीच खळबळ उडाली..
इन्फोसिसच्या एचआर विभागानंच दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात त्यांनी ९,००० कर्मचारी कामावरून कमी केले. जे कमी कौशल्याआधारित काम करायचे, ज्याला लोअर एण्ड जॉब्ज म्हणतात असे हे कर्मचारी..
दर तीन महिन्यांनी त्यांनी २००० लोक कमी केले. अर्थात कमी करताना त्यांना अन्य काही स्किल्स शिकवले गेले, ज्यातून त्यांना बाहेर रोजगारसंधी मिळतील याची काळजी त्यांनी घेतली.
पण एवढे कर्मचारी त्यांनी वर्षभरात कमी केले त्याचं कारण काय?
-ऑटोमेशन!
जगभरातल्या उद्योग-व्यवसाय-रोजगार विश्वात सध्या ऑटोमेशन हा परवलीचा शब्द आहे. आणि कंपन्या भराभर ऑटोमेशन स्वीकारत असल्यानं येत्या काळात बरेच रोजगार माणसांच्या हातून जाणार आहेत अशी चर्चा आहे.
अमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रकची चर्चा आहे. आॅटोमॅटिक ट्रक, आपलेआप यंत्रानं धावतील, ट्रक ड्रायव्हरची गरजच नाही. नुकत्याच झालेल्या रिओ आॅलिम्पिकच्या वार्तांकनाच्या कामाचा प्रयोग म्हणून वॉशिंग्टन पोस्टने रोबोटकडून बातम्या लिहून घेतल्या. अनेक बॅँकांनी तर कर्जप्रकरणं निकाली काढण्यासाठीचं काम आधीच रोबोटकडे देऊन टाकलं आहे.
जे तिकडे दूर घडतं आहे ते आपल्याकडेही घडतं आहे. अनेक नवीन सॉफ्टवेअर्स आल्यानं त्याचप्रकारची एकसाची काम करणाऱ्या माणसांचं काम जातं आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसारत २०२१ पर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षांत भारतातले आयटी क्षेत्रातले ६.४ लाख लो स्किल जॉब जाणार आहेत. कारण ती कामं यंत्र करायला लागतील. पण हाच अहवाल असंही म्हणतो की उच्च कौशल्य आधारित ५६ % जॉब्ज याच काळात वाढतील.
वॉल स्ट्रिट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्राच्या ताज्या लेखानुसार ऑटोमेशन जगाचा चेहराच बदलून टाकत आहे. सगळ्या रोजगारांचा, नोकऱ्यांचा, कामांचा चेहरा बदलेल. त्यातून कामगार आणि कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकावी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांचं उत्पादन वाढेल. यांत्रिकीकरण झाल्यानं रिपिटेटिव्ह कामांमधल्या चुका संपतील. उत्पादन, अचूकता, नेमकेपणा वाढेल.
आणि या काळात जे टिकतील, काम बदलतील, नवीन कौशल्य स्वीकारतील ते टिकतील. जे विशेष कौशल्य दाखवून नवीन कामगिरी करतील त्यांचं करिअर भरभराटीला येईल. पण ज्यांना एकच एक काम येतं, मी तेवढंच काम करीन असं जे लोक म्हणतील त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते.
म्हणजे काय तर जी कामं यंत्र करायला लागतील त्या कामांसाठी माणसांची गरजच उरणार नाही. आणि जी कामं यंत्र करू शकणार नाहीत त्या कामांना सुगीचे दिवस येतील..
या प्रश्नाकडे आपण कसं पहायचं?
संधी म्हणून की संकट म्हणून?
त्याचीच एक चर्चा...
यंत्र जे करू शकणार नाही ते तुम्हाला करता येत असलं तर तुमचा जॉब टिकेल हेच यातलं एकमेव सूत्र. नवनवीन कौशल्ये शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही नोकरीसाठी किंवा करिअरसाठी कायमच लायक असाल. पण नवीन कौशल्य शिकण्याचं, वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून खास वेगळं काम करण्याचा गुण नसेल तर मात्र येणारा काळ अवघड आहे. त्यामुळे यंत्रापेक्षा ग्रेट होणं आपल्याला जमणार आहे का नव्या काळात? हे विचारा स्वत:ला..
सुहास एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये अकाउण्ट्स विभागात, अकाउण्ट पेएबलचे काम करीत होता. पाच वर्षांपूर्वी सुहास येथे जॉइन झाला होता. पाच वर्षांपासून एकच काम करत होता. उत्तम करत होता. या कामानं सुहास आनंदी होता. या कंपनीच्या आधी त्याला तीन वर्षांचा एका भारतीय कंपनीच्या अकाउण्ट विभागाचा अनुभव होता. पगार चांगला होता. दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. स्वत:चा फ्लॅटही बुक केला. दरवर्षी चांगली सॅलरी वाढही मिळत होती. एकंदरीत तक्रार करण्याचं काही कारण नव्हतं. सुहासचा हात धरेल त्याच्या कामात असं कुणी नव्हतं कंपनीत.
परंतु सहा महिन्यांपासून कंपनीत वेगळंच वारं वाहू लागलं. अकाउण्ट विभागात आॅटोबॉट्स येत आहेत असं काहीसं सुहासच्या कानावर पडायला लागलं. झालंही तसंच. कंपनीनं एक नवीन आॅटोमेशनचा प्रोजेक्ट घेतला होता आणि अकाउण्टमधील बहुतांशी काम आता रोबोट करणार होते. कंपन्यांना ज्या व्यक्ती अगर संस्थांना पेमेण्ट्स करायची असतात त्यांची सर्व माहिती, बँक डिटेल्स आणि इनव्हॉइस योग्य प्रकारे प्रोग्रॅममध्ये फीड केली असेल तर अकाउण्टच्या तीन माणसांचं कामं एक व्यक्तीही सहज करणार होता. बाकी कारकुनी कामं हे बॉट्स करणार होते.
हा बदल असा येऊन धाडकन आदळला की त्यात सुहासचा जॉब जाणार हे निश्चित होतं. त्यात गेली पाच वर्षे सुहासने अकाउण्ट्समधील एकच एक काम केल्यानं त्याच्या स्वत:च्याही कामाच्या अनेक मर्यादा होत्या.
व्हायचं तेच झालं, नवीन काम येत नसल्यानं आणि जुन्याची गरजच न उरल्यानं सुहासचा जॉब गेला..
***
तिकडे बंगलोरला एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारा प्रवीण. सॉफ्टवेअर टेस्टिंगचं काम तीन वर्षांपासून तो करत होता. बारा वर्षांचा टेस्टीमधील अनुभव प्रवीणला होता. परंतु कंपनीचाच एक विभाग प्रवीण करत असलेल्या कामाचा आणि त्यासारख्या हजारो कामांचा ‘कॉस्ट व्हर्सेस इम्पॅक्ट’ अर्थात खर्च आणि उपयोग याचा अभ्यास करीत होती. आणि प्रवीण जे काम करतो तशी कामं आता आॅटोमेटेड करण्याचा प्रकल्प राबवण्याचं कंपनीनं ठरवलं. टेस्टिंग आणि क्वॉलिटीचं काम करणाऱ्या जवळपास ९ ते १० हजार लोकांचं काम एकेदिवशी अचानक जाणार होतं.
***
सुहास आणि प्रवीण यांच्यासारख्यांच्या नोकऱ्या आता नव्या काळात ऑटोमेशनमुळे जाणार आहेत. जात आहेत. एकच एक काम उत्तम करणारी ही गुणी माणसं, पण ती कामं करण्यासाठी आता कंपन्यांना माणसांची गरजच उरली नाही. ठरावीक पैशात तंत्रज्ञान विकत घेतलं की पुढे विनावेतन अचूक कामं ही यंत्र करत आहेत. पण मग यासाऱ्यात माणसांच्या रोजगाराचं काय?
मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये दहा वर्षांपासून हे रोबोट्स काम करीत आहेत. आॅटोमोबाइल कंपन्यांच्या असेम्बली लाइनवर, प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये, प्रोग्रॅमेबल लॉजिक कण्ट्रोलरच्या स्वरूपात हे रोबोट्स काम करीत आहेत. आॅटोमेशन, रोबोट, बॉट्स ही तंत्र वेगवेगळ्या स्वरूपात आता कामाच्या ठिकाणी आली आहेत.
या सर्व उदाहरणांचा, गोष्टींचा अर्थ काय?
तो सोपा आणि स्पष्ट आहे.
माणसांनी करावेत असे बरेचशे जॉब आता कॉम्प्युटर घेत आहेत.
आत आपण करत असलेल्या कामांपैकी, जॉब्जपैकी जवळपास ४०-४५ टक्के जॉब्ज हे पुढील पंधरा वर्षांत रोबोटद्वारे करण्यात येतील असा अंदाज आहे. याचा अर्थ एकतर ते जॉब्ज माणसांसाठी उरणारच नाहीत. ते पुढे निर्माण होणार नाहीत. आणि आज ती कामं करणारे लाखो तरुण बेरोजगार होतील. किंवा किमान त्यांच्या हातून ही कामं जातील. या यादीत फक्त कष्टकरी वर्गातली, मेहनतीची कामं करणारी माणसं असतील असं समजू नका. भविष्यातली यादी पाहिली तर वर्तमानपत्राचे वार्ताहर, विविध ठिकाणी काम करणारे अकाउण्टंट, डॉक्टर अर्थात सर्जन, वर्कर, लोडर, क्वॉलिटी बँकर, कारकुनी काम करणारे असे अनेक जॉब्ज आहेत. आणि हे जॉब कंपन्या यंत्रांना का देतील? तर उत्पादकता जास्त, अचूकता जास्त आणि खर्च कमी हा कंपन्यांचा उद्योगाचा उद्देश यंत्र वापरून सफल होणार आहे.
मात्र त्यातून तरुण बेरोजगारांच्या संख्येत भर पडणार हे मात्र निश्चित.
आणि हे सारं घडेल तो काळ फार लांब नाही, हेदेखील तितकंच खरं आहे.
पण मग, पुढे काय?
कुठली कामं ऑटोमेशनमध्ये जातील हे जरा एकदा पहा. ही यादी पाहताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर ती बारकाईनं पहा. माणसं करत असलेली जी कामं यंत्रानं रिप्लेस होतील किंवा होऊ शकतील अशी ही कामं आहेत. हे सर्व जॉब्ज प्रशासकीय आणि नेहमीची रिपेटिटिव्ह प्रकारची कामं आहेत. पण या कामांचा एक साचा आहे, ढाचा आहे, ठरावीक पद्धतीनं रोज करण्याची ही कामं आहेत. त्यात काही नवता नाही. ठरल्याप्रमाणं करण्याची कामं.
अशी रिपेटिटिव्ह प्रकारची कामं कोणतीही असू शकतात.
उदाहरणार्थ मॅनेजर्स काय करतात, सुपरवायझर्स कोणती काम करतात. सुपरवाइज करायला माणसंच नसतील तर मॅनेजर आणि सुपरवायझरचीही गरज पडणार नाही. थोडक्यात जिथं जास्त डोकं लावायची गरज नाही, एका विशिष्ट पद्धतीने तोचतोचपणा असणारी कामं करायची असतात. ती धोक्यात आहेत असं म्हणावं लागेल. शिवाय हे काम शंभर टक्के अचूकतेने आणि नेमकेपणानं होऊ शकतील.
अर्थात, यासाऱ्यात अगदी नकारात्मक विचार करून आपला प्रश्न सुटणार नाही. घाबरून, विरोध करून तर नाहीच नाही. कदाचित या आॅटोमेटेड प्रोसेसला हॅण्डल करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आपल्याला शिकून घ्यावी लागतील. ४५ टक्के जॉब्ज जर इलिमिनेट होणार असतील, तर काही नवीन प्रकारचे जॉब्ज तयार होऊ शकतील.
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलही कदाचित, पण नसेल तर समजून घ्या की सध्या अस्तित्वात असणारे बरेचसे जॉब्ज पाच वर्षांपूर्वी आपल्याला माहितीही नव्हते. म्हणजे काही नवीन कामं निर्माणही होत आहेत. फक्त त्यासाठीचं कौशल्य आपल्याकडे असलं तरच ते आपल्याला मिळतील.
आता हेच पहा, हे बॉट्स निर्माण करण्यासाठी क्रिएटिव्ह वर्कफोर्स लागणारच आहे. म्हणजे नव्या काळात प्रगती करायची असेल तर निरनिराळी कौशल्ये आपल्याला शिकून घ्यावी लागणार आहेत.
काम मिळेल ते कुणाला?
सुहासने जर फक्त एकाच कामाऐवजी वेगवेगळ्या प्रकारची अकाउण्ट विभागातील कौशल्यं शिकली असती, एकाकामापेक्षा वेगवेगळी कामं त्याला येत असती तर कदाचित त्याचा जॉब वाचला असता. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ चा जॉब आता आपल्याला विसरावा लागेल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका रिपोर्टनुसार २१ लाख रोजगारसंधी विशेष कौशल्यं असणाऱ्यांसाठी येत्या काळात उपलब्ध होणार आहेत. पण ती कौशल्यं खास असतील. साच्यातली कामं, रोज तेच ते, त्याच प्रकारचं काम असं ते नसेल. तर त्यासाठी लागेल अॅनालिटिकल स्किल, म्हणजेच विश्लेषणात्मक कौशल्य. याशिवाय इण्टरपर्सनल स्किल, अर्थात संवादात्मक कौशल्य आणि वेगवेगळ्या लोकांकडून सृजनशील काम करून घेत, टीम तयार करता येईल अशा स्किल्सचा त्यात समावेश आहे.
थोडक्यात सुहास आणि आपण साऱ्यांनी या आॅटोमेशनकडे एक उपलब्ध संधी म्हणून बघितल्यास रोजगाराच्या, उत्तम जॉब्जच्या अनेक संधी आपल्याला नव्या काळात मिळतील. उपलब्ध होऊ शकतील. बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतील.
डोक्यातला मेंदू चालवा..
मानवी मेंदूला अजूनतरी पर्याय अर्थात रिप्लेसमेण्ट सापडलेली नाही. एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर कोणतं बिझनेस मॉडेल तयार करावं हे कम्प्युटर सांगू शकतील, पण कोणतं मॉडेल उपयुक्त होऊ शकेल हे सांगण्यासाठी मानवी मेंदूच्या अनुभवावरच अवलंबून राहावं लागेल.
तेच सेल्स आणि मार्केटिंगचं. सेल्स, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मानव संसाधन, फायनान्स कण्ट्रोलिंग, बिझनेसची धोरणं ही कामं मानवालाच करावी लागतील. अर्थात रोबोट्स आणि आॅटोमायझेशन तुम्हाला तेथे मदत करू शकतील.
उद्या वृत्तपत्रातली बातमी जरी रोबोट लिहू शकला तरी बातमीचे विश्लेषण करणारा जॉब लागेलच. बातमीच्या पलीकडे जाणाऱ्या पत्रकाराला काम असेलच. तेच वकिलाचे काम. उद्या लिगल डॉक्युमेण्ट्स वाचून, त्यातले सारे टिपण रोबोट काढेलही पण अभ्यास करून केससाठी जजसमोर वकिलालाच उभं रहायचं आहे.
यंत्र जे करू शकणार नाही ते तुम्हाला करता येत असलं तर तुमचा जॉब टिकेल हेच यातलं एकमेव सूत्र.
येणाऱ्या काळासोबत अॅडजस्ट करता येत असेल आणि नवनवीन कौशल्यं शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही नोकरीसाठी किंवा करिअरसाठी कायमच लायक असाल. पण नवीन कौशल्यं शिकण्याचा, वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून खास वेगळं काम करण्याचा गुण नसेल तर मात्र येणारा काळ अवघड आहे.
त्यामुळे यंत्रापेक्षा ग्रेट होणं आपल्याला जमणार आहे का नव्या काळात?
हे विचारा स्वत:ला..
विनोद बिडवाईक
vinodbidwaik@gmail.com
(प्रथम प्रसिद्धी : लोकमत, ऑक्सिजन , पुरवणी, दिनांक, ८ फेब्रु २०१७.)