शनिवार, २० जून, २०१५

पुढील तीन वर्षांत / पाच वर्षांत तुम्हाला स्वत:ला कुठे बघायला आवडेल’


"सर, पुढील पाच वर्षांत मला मॅनेजर व्हायचं आहे". एक उमेदवार, मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देत सांगत होता.  प्रश्न होता, ‘पुढील तीन वर्षांत / पाच वर्षांत तुला स्वत:ला कुठे बघायला आवडेल’?’

नुकत्याच कॉलेजमधून बाहेर पडणारा हा उमेदवार तीन ते पाच वर्षांत व्यवस्थापक बघण्याची स्वप्नं पाहतो, यात चुकीचं काहीच नाही; परंतु अशा प्रश्नांची उत्तरं देताना थोडं वास्तवाचं, स्वत:च्या कुवतीचं भान ठेवायला नको का? 

बर्याच मुलांना वेगवेगळ्या आणि भन्नाट अशा पदांची भुरळ पडते. बर्याचदा उमेदवाराच्या कामाचा आणि पदाचा काहीच संबंध नसतो. पद म्हणजेच डेसिग्नेशन बर्याचदा फसवी असतात. एका बँकेच्या कर्मचार्याचं पद होतं रिजनल मॅनेजर आणि तो प्रत्यक्षात तो घराघरात / ऑफिसात जाऊन बँकेचे खाते उघण्याचं काम करायचा आणि रिजन म्हणजे तरी केवढा भाग तर  पुण्यातील कोथरुड हे एवढंच त्याचं रिजन. आणि ते मॅनेज करणारा हा मॅनेजर ! 

त्यामुळे अशा प्रश्नांकडेही मुलाखत देताना जरा बारकाईनं पहायला हवंच.

मुळात आपल्या आयुष्याचं ध्येय काय हे जर स्वत:ला क्लिअर नसेल तर अशा किचकट प्रश्नांची उत्तरं जास्तच अवघड वाटतात. बीई आणि एमबीएची डिग्री हातात असेल तर कदाचित नोकरीला लागल्यावर तीन वर्षांत मॅनेजर होण्याची संधी मिळतीलही,  पण हे असं टामटूम मॅनेजर होऊन तुम्ही काय कमवाल?

त्यापेक्षा स्वत:च्या कामाचं ध्येय जरा गांभीर्यानं घ्या आणि तुमच्या बायोडाटामध्ये ऑबजेक्टिव्ह नावाचा जो प्रकारही एकदा वाचाच. खरंतर ते स्वत:चं ध्येय, ते स्वत: लिहावं पण कॉपीपेस्ट करण्याच्या नादात ते काही कुणी वाचत नाहीच. 

नसेलही तुमचं तुम्हाला क्लिअर की आपल्याला पुढे काय करायचं तर स्पष्ट सांगा, तेही अगदी नम्रपणे. ‘‘सर, सध्या तरी माझी प्रायॉरिटी चांगल्या कंपनीत चांगला जॉब मिळावा हीच आहे, पुढील तीन वर्ष या जॉबमध्ये सेटल होऊन कंपनीला योग्य ते आऊटपुट देणं हेच माझं ध्येय असेल’’ 

आता विचार करा, हे उत्तर चांगले की ‘‘मला मॅनेजर व्हायचंय, हे उत्तर चांगलं?’’ विचार करा!
तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर त्या अनुभवांवर चांगले पद केव्हाही मिळेल. मात्र तुम्हाला नुस्तं पद हवंय की ‘रोल’ हवाय? हे महत्त्वाचं. 

तेव्हा तुमचं ध्येय ठरवा, ते तुम्ही मागत असलेल्या जॉबशी लिंक कसं करायचं हे शिका तरच तुम्ही गर्दीत वेगळे दिसाल. नामकेवास्ते टामटूम पदाची प्रौढी मिरवण्यात काय हाशिल?